मुंब्राः बकरी ईदसाठी मुंब्र्यातील डोंगरे चाळीसमोर (सर्व्हे नंबर २९), एमएम व्हॅली (सर्व्हे नंबर ५०, हिस्सानंबर ३, हुडा पार्क (सर्व्हे नंबर ५०/३/१, नदीहुल मदरसा (प्लाॅट नंबर ७८,७९८०),ए.व्ही. कम्पाउंड (सर्व्हे नंबर ६५, हिस्सा नंबर १ या पाच ठिकाणी २१ ते २३ जुलै दरम्यान तीन दिवसांसाठी कुर्बानीसाठी तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात येणार आहेत.
नियोजित कत्तलखान्यांना प्रशासनाने परवानगी द्यावी, यासाठी नुकताच ठामपाचे विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण यांनी बैठक आयोजित केली होती. या ठिकाणांव्यतिरिक्त इतरत्र कुर्बानी करण्यात येऊ नये, इतर समाजाच्या भावना दुखावतील, असे वर्तन करू नये, कुर्बानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये, नमाजासाठी शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, असे कुठलेही वर्तन करू नये, स्वच्छता राखावी, असे आवाहन मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, तसेच प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी केले आहे.