लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात महावितरणचे ३५ हजार थकबाकीदार होते. गेल्या सहा महिन्यात या थकबाकीदारांकडून पूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली आहे.
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भाग परिसरात जानेवारी महिन्यामध्ये तब्बल ३५ हजार ग्राहकांकडे वीजबिलाची थकबाकी होती. या ग्राहकांकडे बिल वसूल करण्यासाठी महावितरणने मार्चपर्यंत तगादा लावला होता. त्यानंतर बिल भरले जात नसल्याने अधिकाऱ्यांनी थेट ग्राहकांचे वीज मीटर काढून नेण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईनंतर धास्तावलेल्या ग्राहकांपैकी निम्म्या ग्राहकांनी एप्रिल महिन्यात आपली थकबाकी भरून आपला वीजपुरवठा सुरळीत करून घेतला होता. मात्र त्यानंतरही १५ हजारांहून अधिक वीजग्राहकांकडे थकबाकी तशीच शिल्लक होती. जून महिन्यात पुन्हा कारवाई करीत ग्राहकांना थकबाकी भरण्यास भाग पाडले. अनेक ग्राहकांचे रोजगार हिरावले गेल्यामुळे त्यांनी महावितरणकडे थकबाकी भरण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. मात्र नियमाप्रमाणे त्यांना अवघी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. या अल्प कालावधीमुळे अनेक ग्राहकांना वीजबिल भरता आलेले नाही. त्यामुळे महावितरणने मीटर काढून त्या ग्राहकांवर कारवाई केली.
अंबरनाथ शहरात तब्बल ३५ हजार ग्राहकांकडे वीज थकबाकी होती. त्यातील ३० हजार ग्राहकांनी आपली थकबाकी भरून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. मात्र अद्यापही पाच हजाराहून अधिक ग्राहक थकबाकीच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यातील ९० टक्के ग्राहक हे बिल भरण्याची क्षमता नसल्यामुळे अडकून पडले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यावर काही ग्राहक परस्पर शेजारच्यांकडून वीजपुरवठा घेऊन प्रत्येक दिवस पुढे ढकलण्याचे काम करीत आहेत. अंबरनाथमध्ये ३०० हून अधिक दुकानदारांचे वीजबिल थकीत असून त्यांनी अद्यापही आपली थकबाकी भरलेली नाही.