ठाणे : राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोरोनाचे नियम पायदळी तुडवून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चार थर लावून दहीहंडी फोडली. याप्रकरणी मनविसे ओवळा-माजिवडा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांना वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका केली.
राज्य शासनाने दहीहंडी साजरी करण्याचे आवाहन करूनदेखील उत्सवावरील निर्बंध झुगारून मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनीही दहीहंडी साजरी केली. वर्तकनगर येथे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री १२.२० वा. चार थर लावून मनसेचा झेंडा फडकविला. यावेळी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. मंगळवारी दुपारी वर्तकनगर पोलिसांनी विद्यार्थी सेनेच्या संदीप चव्हाण, मयूर तळेकर, मंदार पाष्टे, सागर वर्तक यांना अटक करून नंतर जामिनावर सुटका केली.
------------------------
इतर पक्षांच्या यात्रा, आंदोलने असतात तेव्हा कोरोना नसतो का? हिंदू सणांवर कितीही निर्बंध आणले तरी मनसे ते साजरे करणारच. नियमावली द्या, आम्ही त्याचा अवलंब करू - संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे