ठाणे: कोविड काळात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे ठाणे शहरासह मुंब्य्रातील काही खासगी रुग्णालयांमध्ये काही कोरोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या निषेधार्थ आंदोलन करणारे तत्कालीन विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना बुधवारी नौपाडा पोलिसांनी अटक केली. सक्षम जामीन दिल्यानंतर त्यांची पोलीस ठाण्यातच जामीनावर सुटका करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरासह मुंब्रा, कळवा आदी भागात कोविड काळात आरोग्य विषयक साधनांची प्रचंड कमतरता निर्माण झाली होती. ठाणे महानगरपालिकेकडून रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेली साधने पुरविण्यात वेळ जात जात होता. त्यातच मुंब्रा येथील बिलाल, रेहमानीया, बुऱ्हानी, प्राईम आदी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर न पुरविण्यात आल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे संतप्त झालेल्या पठाण यांनी २० एप्रिल २०२१ रोजी रिकामा ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ठाणे महापालिका मुख्यालयात आंदोलन केले होते. तसेच, ठामपा मुख्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पठाण यांना नौपाडा पोलिसांनी पाचारण करुन अटक केली. दरम्यान, पठाण यांच्यावरील कारवाईची माहिती मिळताच मुंब्रा येथून शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. पठाण यांच्या सुटकेनंतर मात्र याच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.