ठाणे : मागील सहा महिन्यांपासून घुसखोर बांगलादेशींना आश्रय देणार्या शरद भांने या घरमालकाला बुधवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्या घरमालकाने पोलीस कारवाईतून बचावासाठी बोगस अॅग्रिमेंट तयार केले. तसेच बांगलादेशींकडे मिळालेले शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, मतदान कार्ड बोगस असल्याचीही बाब उघडकीस आली आहे. त्याच्यासह पकडलेल्या बांगलादेशींना येत्या २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही बांगलादेशी नागरिक अनधिकृतरीत्या वास्तव्यास असून त्यामध्ये अहमदनगर येथील स्रेहालय या रेस्क्यू होममधून पळालेल्या दोन महिला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकासह मानपाडा पोलिसांनी ढोकळीगाव, आडिवली येथे संयुक्तरीत्या शुक्रवारी १२ आॅक्टोबर छापा टाकून सात जणांना अटक केली. त्यामध्ये एका भारतीय महिलेसह प्रत्येकी तीन बांगलादेशी पुरुष आणि महिला समावेश आहे. याचदरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असताना, एखादे घर भाड्याने देताना त्याबाबत माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे.त्या अनुषंगाने तपास सुरू असताना घरमालक शरद भांने यांनी तशी कोणीही माहिती पोलिसांना दिली नसल्याची बाब पुढे आली. त्यानंतर त्याला अटक केली.तसेच बांगलादेशीला अटक झाल्याची माहिती समजताच त्याने तातडीने बोगस अॅग्रिमेंटही तयार केल्याचे तपास पुढे आहे. तसेच फायल आणि इमदादूल या दोघांकडे बांगलादेशी पासपोर्ट मिळून आले आहे. फायल हिच्याकडे भारतीय कागदपत्रे, आधारकार्ड आणि पॅनकार्ड मिळून आले आहेत.तर मोहम्मद शहाजान यांच्याकडे मिळालेले शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड आणि मतदान कार्ड हे बोगस असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच राखी तालुदार हिच्याकडेही आधार कार्ड आणि बँक पासबुक मिळून आले आहे. त्यानुसार, बनावट दस्तऐवज मिळाल्याप्रकरणी आणखी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर यांनी दिली.
बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:22 AM