मुंब्रा : एमडी पावडर (अमली पदार्थ) विकण्यासाठी मुंब्य्रात आलेल्या दोघांना पोलिसांनीअटक करून, त्यांच्याकडून सुमारे १३ लाख रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मुंब्रा पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली.
रेतीबंदर परिसरातील सर्व्हिस रोडजवळ एमडी पावडर विकण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे सहकारी उदय किरपण यांना मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, कमलाकर भोये, उदय किरपण, सुदीप हुलवान, योगेश पाटील, छोटू दाभाडे, भूषण खैरनार यांनी सापळा रचून मनीष कुमार बोरिचा (३४, रा. मुंबई) आणि त्याचा साथीदार रवी खोडा भाईवाला (३२, मुंबई) या दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले.
अंगझडतीत बोरिचा याच्याकडे २५३ ग्रॅम वजनाची १२ लाख ६५ हजार रुपयांची एमडी पावडर आढळली. याशिवाय, आरोपींनी गुन्ह्णासाठी वापरलेली दुचाकी, मोबाइल फोन आणि रोकड असा एकूण १२ लाख ९८ हजार ३०० रु पयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपींनी एमडी पावडर ज्याच्याकडून विकत घेतली, त्या दोघांचा तपास सुरू असल्याची माहिती वपोनि मधुकर कड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर करत आहेत.