अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील सुरेश जैन यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात कामाला असलेल्या कर्मचाºयानेच दुकानतील १ कोटी ५ लाख ५५ हजार ७६६ रुपयांचे दागिने चोरुन पसार झालेल्या चोरोला ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून ९०० गॅ्रम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत दागिन्यांचा शोध घेतला जात आहे. केवळ मौजमजेसाठीच आरोपी हा दागिन्यांची चोरी करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल मेहता असे असून तो मुळचा राजस्थानचा असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. फिर्यादी सुरेश जैन यांनी त्यांच्या दुकानात काम करणारा सेल्समन राहुल मेहता रा. गावदेवी मैदान, ठाणे याच्या ताब्यात विश्वासाने विक्रीकरीता दिलेल्या दागिन्यांपैकी ३८ छोटे व मोठे सोन्याचे हार, सोन्याचे २४ जोडी कर्णफुले, ०३ सोन्याची चेन, ०५ सोन्याचे बाजुबंद एकूण ७० दागिने त्याचे वजन १५९९.४७० ग्रॅम व त्याची किमंत १ कोटी ५ लाख ५५ हजार ७६६ असून त्या दागिन्यांचा अपहार केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपआयुक्त सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक अभय महाजन, पोलीस निरिक्षक (गुन्हे) कुंभार यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपासात करण्यात आला.
त्यानुसार राहुल याचा तपास राहत्या घरी, तसेच कामाच्या ठिकाणी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता आरोपी ८ मार्च पासून कामावर येत नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्या पत्नीने १५ मार्च रोजी मिसिंगची तक्रार केली होती. तर राहुल याने चोरी करुन ती चोरी उघड होईल या भितीने तो मोबाइल बंद करुन पसार होता. तर आरोपी हा मधल्या काळात मिरा रोड, मुंबई, इंदौर, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचे पुढे आले. तसेच आरोपीचे नातेवाईक, मित्र, पत्नी यांच्या हालचालींवर पोलीसांचे लक्ष होते. त्याच काळात आरोपी हा मैत्रीणीला भेटण्यासाठी मिरारोड येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार २६ मार्च रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला अटक करण्यात आले असून त्याला ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर आरोपी याने चोरलेले दागिने इतर ज्वेलर्सवाल्यांना विकले असल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच त्यातून मिळालेल्या पैशातून तो मौजमजा करीत असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान अटक आरोपी याच्याकडून चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी २६ हार, २१ कानातील कर्णफुले व ३ गळ्यातील चेन आसा सुमारे ६२ लाख १० हजार रुपये किमंतीचा ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.