ठाणे : वन्यप्राणी तसेच पक्ष्यांची रेल्वेने तस्करी करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील अब्दुल नबी ऊर्फ परवेज खान (रा. मिस्त्रीगंज, हैदराबाद) याला ठाणे वनविभागाने हैदराबाद येथून नुकतीच अटक केली. त्याच्याकडून ठिपकेदार सात मुनिया पक्षी, तर १६ सुगरण पक्ष्यांची सुटका करण्यात आली आहे. त्याला २१ डिसेंबरपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने गुरुवारी दिले. याआधी त्याच्या दोन साथीदारांना ठाणे वनविभागाने अटक केली आहे.
वन्यपक्षी तसेच प्राण्यांची रेल्वेने तस्करी केली जात असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे रेल्वेस्थानकातून १० डिसेंबर रोजी आर.के. मोहम्मद खलील रियाज अहमद (२४, रा. बंगळुरू, कर्नाटक) याला ताब्यात घेतले होते. त्याच्या ताब्यातून एक घार, तीन शिक्रा, तुरे असलेले एक घुबड आणि एक विदेशी घोरपड असे पाच वन्यजीव ताब्यात घेण्यात आले. त्याला १८ डिसेंबरपर्यंत वनविभागाची कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्याच्याकडून जप्त केलेले पक्षी हे हैदराबाद येथून खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली. त्यातील काही पक्षी हे मुंबई येथील शाहरूख खान (रा. भायखळा) आणि किशन रामपाल (रा. मुंबई) यांना तो विक्री करणार होता. या माहितीच्या आधारे शाहरूखला १२ डिसेंबर रोजी, तर किशनला १४ डिसेंबर रोजी भायखळा भागातून अटक केली. किसन याच्याकडून दोन जांभळ्या रंगाचे पोपट जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनाही १६ डिसेंबरपर्यंत वनविभागाची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, या आरोपींच्या चौकशीतूनच १७ डिसेंबर रोजी ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक बी.टी. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनक्षेत्रपाल मनोज परदेशी, वनपाल संजय पवार आणि वनरक्षक प्रवीण आव्हाड यांनी हैदराबाद येथून मुख्य आरोपी शेख अब्दुल नबी ऊर्फ परवेज खान याला १७ डिसेंबर रोजी पक्षीविक्री करण्याच्या दुकानातून सात ठिपकेदार मुनिया पक्षी आणि १६ सुगरण पक्षी अशा २३ पक्ष्यांसह अटक केली. या कारवाईमध्ये वनविभागाने वेगवेगळ्या प्रजातींचे ४७ पक्षी आणि सात वन्यप्राणी या आरोपींकडून जप्त केले आहेत. सर्व वन्यप्राणी तसेच पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वन्यजीवविषयक कोणतीही तक्र ार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यानिमित्ताने ठाणे वनविभागाने केले आहे.