ठाणे: पूर्ववैमनस्यातून तलवारीच्या धाकावर अयतीशान खान (१९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील साहिल उर्फ आशू प्रमोद मिश्रा (२२, रा. हाजुरी, ठाणे) यास वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
अयतीशान खान आणि त्याचा मित्र मौसिम खान हे जिलानीवाडी मस्जिदच्या गेटजवळ वागळे इस्टेट येथे १२ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्यावेळी बहाद्दूरसिंग मेहरा, शाहरुख खान, साहिल उर्फ आशू आणि अन्य एक जण असे चौघेजण दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवरून तिथे आले. त्यांनी तलवारीच्या धाकावर अयतीशान याला त्यांच्या मोटारसायकलवर बसवून ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून श्रीनगर, रामनगर भागातील जंगलात नेले. या टोळक्यापैकी बहाद्दूर याने शाहरूख याच्या हातातील तलवार घेऊन अयतीशान आणि त्याच्या मित्राला शिव्या देऊन तलवारीच्या पुढील टोकाने मौसिम याच्या पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. नंतर या टोळक्याने आपसात संगनमत करून अयतीशान आणि मौसिम या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी शाहरूख याने मौसिम याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून जखमी केले. त्यानंतर पुन्हा पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवर बसवून त्यांना काल्हेर येथील टोलनाक्याच्याजवळ नेवून तिथेही पुन्हा लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर तुम्हाला आणि तुमच्या आई - वडिलांना ठार मारू, अशी धमकीच बहाद्दूर याने त्यांना दिली. याप्रकरणी १३ जुलै रोजी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ आदींच्या पथकाने यातील आशु उर्फ साहिल याला अटक केली. उर्वरित इतरांचाही शोध सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.