ठाणे : बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली ३८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कृष्णा पांडे (४५, रा. खोपट) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पांडे हा अंधेरी येथील एका बँकेत व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. आधी तो दिल्ली येथे कार्यरत होता. दिल्लीत जाण्यापूर्वी मुंबईतील एका बँकेत साफसफाईचे काम करणाऱ्या महिलेशी त्याची ओळख झाली होती. मध्यंतरी नोकरीवरून तिला कमी करण्यात आले होते. नव्याने ती नोकरीच्या शोधात असतानाच पुन्हा मुंबईत आलेल्या पांडे याने तिला बँकेत पुन्हा रूजू करण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार १९ जून २०२१ ला रात्री ९.३० च्या सुमारास ठाण्यातील जिंजर हॉटेलमध्ये तिला त्याने बोलविले. एका खासगी कंपनीच्या संचालकाशी बोलणी करण्याच्या बहाण्याने या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील एका रूममध्ये घेऊन जाऊन दारूच्या नशेतच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली.
नोकरी लावण्याच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणाऱ्या पांडेविरुद्ध तिने अखेर ५ जुलै २०२१ ला राबोडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाकडूनही समांतर तपास सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय भिवणकर आणि पोलीस नाईक हेमंत महाले आदींच्या पथकाने ७ जुलैला रात्री पांडे याला अटक केली.
-------------