ठाणे : मुंबईत रिक्षांची चोरी करून त्या ठाणे, भार्इंदर भागात भाड्याने देणा-या इम्रान शेख (३२, रा. हाजुरी, ठाणे) आणि अब्दुल सय्यद (२७, रा. डोंगरी, भार्इंदर, ठाणे) या दुकलीला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ रिक्षा आणि चार दुचाकी अशी ११ लाख ८० हजारांची वाहने जप्त केल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली. आरोपींना २२ फेबु्रवारीला अटक केल्यानंतर तपासात ही बाब उघड झाली. दोघांनाही २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.मुंबईतील जोगेश्वरी, कुरार, कस्तुरबा मार्ग अशा वेगवेगळया भागातील रिक्षा हेरून त्यांची चोरी इम्रान आणि अब्दुल हे दोघे करीत होते. चोरीतील रिक्षाला ठाणे पासिंगचा क्रमांक लावला जायचा. त्यानंतर ती भार्इंदर भागातील एखाद्या चालकाला ३०० ते ४०० रुपये शिफ्टनुसार भाड्याने ते देत होते. दिवसाला साधारपपणे एक हजारांची कमाई ते या माध्यमातून करीत होते, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी इटर्निटी मॉल परिसरातून तेजस खानखोजे यांची दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच चोरीचा तपास वागळे इस्टेट पोलीस करीत असतांना हाजुरी चौक परिसरात दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या रेंगाळत असल्याची माहिती पोलीस शिपाई नितीन बांगर यांना मिळाली होती. इम्रान शेख अशी स्वत:ची ओळख त्याने सांगितली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणा-या इम्रानने नंतर मात्र दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिकेत पोटे, नाईक अरुण बांगर, के. जी. जाधव, सुनिल शेलार, ए. बी. खेडकर, नितिन बांगर आणि मुकूंद राठोड आदींच्या पथकाने वागळे इस्टेट येथील बंद ‘बुश’ कंपनीच्या आवारातून एक दुचाकी सुरुवातीला जप्त केली. त्यापाठोपाठ त्याचा साथीदार अब्दुल सय्यद यालाही कासारवडवली भार्इंदर पश्चिम भागातून २२ फेब्रुवारी रोजी एका रिक्षासह अटक केली. त्याच्याकडील रिक्षा जोगेश्वरीतून चोरी केल्याची त्याने कबुली दिली. न्यायालयाने त्यांना दिलेल्या पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मीरा भार्इंदर येथील पुलाखाली ठेवलेल्या आणखी आठ दुचाकी आणि तीन दुचाकीही पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या. रिक्षांचे क्रमांक बदलून गरजू चालकांना ते शिफ्टवर चालविण्यासाठी देत असल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांनी सांगितले.
मुंबईतील रिक्षा चोरी करणाऱ्या दुकलीला ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:01 PM
मुंबईतील वेगवेगळया भागातील रिक्षा हेरून त्यांची चोरी करणा-या दुकलीला वागळे इस्टेट पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. चोरीतील रिक्षाला ठाण्याचा क्रमांक लावून शिफ्टनुसार ते भाड्याने ते देत होते.
ठळक मुद्देरिक्षासह १३ वाहने जप्तगरजूंना रिक्षा शिफ्टवर देऊन केली ‘कमाई’वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई