मीरा रोड : भाईंदरच्या राई शिवनेरी येथील एका व्यक्तीच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी साप्ताहिकाच्या प्रतिनिधीकडून तीन हजारांची खंडणी घेताना साप्ताहिकाच्या संपादकास गुन्हे शाखेने अटक केली आहे.
भाईंदरच्या राई येथील शिवनेरीनगर या सरकारी जमिनीवर उभ्या राहिलेल्या पक्या चाळींच्या झोपडपट्टीत गल्ली क्रमांक २९ मध्ये नीलेश गायकर हे कुटुंबासह राहतात. त्यांनी घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू केले होते. हे बांधकाम बेकायदा असल्याने रवींद्र जैन या स्थानिक साप्ताहिकाच्या संपादकाने जाऊन छायाचित्रे काढली. गायकर यांच्या परिचयातील असलेले स्थानिक साप्ताहिकाचे प्रतिनिधी सुधीर महाडिक यांच्याकडे जैन याने बांधकाम प्रकरणी पाच हजारांची खंडणी मागितली. अखेर तीन हजारांवर तडजोड झाली. दरम्यान, जैन याने गायकर यांच्या बेकायदा बांधकामाचे फोटो तसेच महाडिक हे सर्वांना पाच - पाच हजार रुपये वाटत असल्याचे व्हायरल केले होते.
याप्रकरणी महाडिक यांनी पोलीस उपायुक्त डॉ.महेश पाटील यांच्याकडे जैनची तक्रार केली. पाटील यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या पथकाने सापळा रचून जैन याला महाडिक यांच्याकडून तीन हजारांची खंडणी घेताना पकडले.