ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी रविवारपासूनच घरोघरी बाप्पांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. मूर्तिकारांनी गणेशभक्तांना वेळ आणि तारीख ठरवून दिली असल्याने त्याप्रमाणे गणेशभक्त मूर्ती घेऊन येताना दिसत आहेत.कोरोनाच्या सावटाखाली असणाऱ्या गणेशोत्सवात नियम पाळून उत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गणेशभक्तांबरोबर मूर्तिकारांनीही योग्य ती दक्षता घेतली आहे. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या दिवशी किंवा फार तर आदल्या दिवशी घरगुती गणेशाचे आगमन होत असते. कोरोनामुळे यंदा उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. आगमनापासून विसर्जनापर्यंत भक्तांनी घ्यावयाच्या काळजीबद्दल ठाणे महापालिकेने नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. मूर्तिकारांनी बुकिंग घेतल्यावर सर्व गणेशभक्तांना फोन करून तारीख आणि वेळ ठरवून दिली.>रोज २०० मूर्तींचे वितरणमूर्तिकारांनीही बाहेर टेबल ठेवले असून तिथूनच मूर्ती दिल्या जात आहेत. बाप्पांच्या आगमनादिवशी गर्दी होऊ शकते, यासाठीच या पद्धतीने मूर्ती देण्याचे सर्व मूर्तिकारांनी ठरविले. त्यांनी स्लॉट ठरविले असून प्रत्येक दिवशी १०० ते २०० मूर्ती दिल्या जात आहेत. दिवसातून दोन ते तीन वेळा सॅनिटायझरने बाहेरचा भाग स्वच्छ केला जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.>गणेशभक्तांनी सकाळी ९ ते १२ यावेळेस मूर्ती घेऊन जाण्याचे त्यांना फोन करून सांगितले. प्रत्येकाला आम्ही फोन केले. ज्यांनी बुकिंग केले नाही, ते मात्र थेट घेऊन जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याकडे आमचे लक्ष असते. गर्दी टाळता यावी म्हणून प्रत्येकाला स्लॉट दिला आहे, त्याप्रमाणे मूर्ती घेऊन जात आहेत. यंदा पीओपी आणि शाडूमातीच्या मूर्ती बनविल्या. त्यात शाडूमातीच्या मूर्तींवर गणेशभक्तांनी जास्त भर दिला.- प्रसाद वडके, मूर्तिकार
गर्दी टाळण्यासाठी रविवारपासून सुरू झाले बाप्पांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 1:49 AM