कल्याण : केडीएमसी हद्दीतील खड्डे बुजवले गेले नसल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यांतून होत आहे. मात्र, प्रशासनाला त्याचे काही पडलेले नाही, अशी जोरदार टीका बुधवारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली.शिवसेनेच्या नगरसेविका शालिनी वायले, छाया वाघमारे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. अनेक रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत. पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर केले जाईल, असे आश्वासन स्वत: आयुक्तांनी दिले होते. प्रत्यक्षात त्याप्रकारे काम झालेलेच नाही. गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवणे अपेक्षित होते. मात्र, अनेक रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यांवर टाकलेली खडी आता इतरत्र पसरली आहे. त्यामुळे खडीवरून वाहने विशेषत: दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले.कल्याण शहर व परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर, स्थायी समितीने १३ कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी मंजूर केल्याने तातडीने कामास सुरुवात झाली. भरपावसाळ्यात खड्डे बुजवले गेले. ते कामही निकृष्ट झाले आहे. आता पाऊस थांबला असूनही खड्डे बुजवण्याचे काम केले जात नाही. गणेशोत्सवापूर्वी ते होणे गरजेचे होते. याप्रकरणी काय कारवाई करणार, असा सवाल सदस्यांनी केला.कल्याण-मलंग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेला होता. तेथील खड्डे अद्याप बुजवलेले नसल्याने त्याकडे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पावसामुळे हे काम रखडल्याचे कारण प्रशासनाने दिले होते. आता पाऊस थांबला आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, प्रशासनाने कोणतेच उत्तर दिलेले नाही. या सभेला शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी उपस्थित नसल्याने प्रशासनाने काहीच सांगितले नाही.>टिटवाळ्यातील रस्त्यांची अवस्था बिकटटिटवाळा : शहर आणि ग्रामीण भागांतील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भाविकांना खड्डे चुकवत गणेशमूर्ती न्याव्या लागल्याने त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. टिटवाळा-फळेगाव रस्त्यावरील रुंदे गावालगतच्या काळू नदीवरील पुलावर खड्डे आहेत. पळसोली ते गेरसेपर्यंत, राया ते खडवली, कोलिंब ते पोई रस्त्याची चाळण झाली आहे. शहरातील वाजपेयी चौक ते रेल्वे फाटक तसेच गणपती मंदिर चौक ते म्हस्कळफाटा रस्त्यादरम्यान भुयारी गटाराचे काम करण्यात आले. मात्र, रस्त्याची दुर्दशा आहे. शिवसेना शाखा ते निमकरनाका या रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. परंतु, कंत्राटदाराच्या मनमानीमुळे येथील रस्त्यांवर वाहन तर सोडाच, पण नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.
गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच, महापालिका प्रशासन ढिम्मच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:35 AM