ठाणे : गणपती बाप्पाच्या आगमनानंतर माहेरवाशीण गौराईच्या आगमनाचे वेध भक्तांना लागतात. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात रविवारी सुमारे १६ हजार गौराईंचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. मोठ्या थाटात त्या घरोघरी विराजमानही झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक आठ हजार ५६ गौरी या उल्हासनगर आणि परिसरात आल्या आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट असले तरी गणेश चतुर्थीला ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एक लाख ४२ हजार ७८ गणरायांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. यातील दीड दिवसांच्या बाप्पांना भाविकांनी शनिवारी निरोप दिला तर रविवारी गौरी मातेचे आगमन झाले. ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ७१७ गौराई विराजमान झाल्या आहेत. यामध्ये उल्हासनगर खालोखाल कल्याणमध्ये तीन हजार ३६४, वागळे इस्टेट येथे एक हजार ९१२, ठाणे शहरात एक हजार ८२५ आणि भिवंडीत ५६० गौराईंचा समावेश आहे. या आगमनानंतर गौराई मातेची सोमवारी विधीवत पूजा होणार असून, मंगळवारी त्यांचे विसर्जन होणार आहे.