ठाणे : पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी (नाना जोशी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात `आयुर्वेद रथयात्रा' काढण्यात आली आहे. १३ डिसेंबर रोजी या रथयात्रेचे ठाण्यात आगमान होत आहे. यानिमित्ताने ठाणे शहरात विविध ठिकाणी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी एका पत्रकार परिषदेत संयोजक डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिली.
पत्रकार परिषदेला डॉ. चंद्रा शेट्टी, डॉ. अक्षय भोईर, डॉ. समिर घोलप, लायन रमेश जाधव उपस्थित होते. पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी (नाना जोशी ) यांचे धुळे हे कर्मस्थान. येत्या ५ जानेवारी रोजी त्यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांत `आयुर्वेद रथयात्रा' काढण्यात येत आहे. २ डिसेंबर रोजी या `आयुर्वेद रथयात्रा'ला तुळजापूर येथून प्रारंभ झाला आहे.
१३ डिसेंबर रोजी ठाण्यात येणाऱ्या रथयात्रेचे नियोजन प्रभा आयुर्वेद, आरोग्यधाम, निमा ठाणे, आयुर्वेद संमेलन, आरोग्य भारती, आयुर्वेद व्यासपीठ, लायन्स क्लब या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
१३ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता या रथयात्रेला प्रारंभ होईल. यावेळी ठाणे महापालिका उपायुक्त मनिष जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी स्मिताली उमरजकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हा आयुर्वेद रथ ठाणे शहरात फिरणार आहे. या रथात आयुर्वेदीक औषधे आणि माहिती पत्रक असून ठिकठिकाणी जाऊन ते ठाणेकरांना आयुर्वेदाबद्दल माहिती देणार आहेत. ठाण्यातील २० आयुर्वेदीक डॉक्टर्स आपल्या आरोग्य केंद्रात १३ डिसेंबर रोजी एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार करणार आहेत. तर पोलीस बांधवांसाठीही विनामूल्य आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर पोलीस ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आले आहे.
आयुर्वेद रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर एमएच शाळेतील २४०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे. तर १२ डिसेंबर रोजी मुलांसाठी सुवर्णप्राशन शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.