ठाणे : शेकडो कलाकार घडवून ठाण्यात सांस्कृतिक चळवळ उभी केलेल्या अभिनय कट्ट्याची २९ आॅगस्टच्या पावसात वाताहत झाली. कट्टा सावरण्याच्या, उभा करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी ठाण्यातील काही मराठी कलाकार कट्ट्यावर एकत्र आले. कट्ट्याची अवस्था पाहिल्यावर सुन्न झालेल्या कलाकारांनी स्वत: मदत करण्याचे आश्वासन देऊन उपस्थितांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले.जिजामाता उद्यान येथे भरणाºया अभिनय कट्ट्याचे तुफान पावसात प्रचंड नुकसान झाले. नेपथ्य, ध्वनियंत्रणा, आसनव्यवस्था, पुस्तके आणि कार्यालयातील संगणक व इतर वस्तूंचे नुकसान झाले. परिणामी, या आठवड्यात कट्ट्यावर सादरीकरण होऊ शकले नाही. या कट्ट्याला शुक्रवारी प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव, विजू माने, निर्माते अभिजित पानसे, अभिनेते मंगेश देसाई, उदय सबनीस, टॅग संस्थेच्या सोनाली लोहार, वासंती वर्तक, शशी करंदीकर आदी कलाकारांनी भेट दिली. कट्ट्याचे सर्वेसर्वा किरण नाकतीही उपस्थित होते. या वेळी कलाकारांनी कट्ट्यावर उपस्थित प्रेक्षकांना कट्ट्याला मदत करण्याचे आवाहन केले. गेली २२ वर्षे आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाकती हे स्वत: नवोदित कलावंतांना घडवण्यासाठी मेहनत घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कट्ट्याने दिव्यांग मुलांसाठीही वर्ग सुरू केले आहेत. अशी ही सांस्कृतिक चळवळ संपू नये, यासाठी ठाणेकरांनी मदत करावी, असे आवाहन पानसे यांनी या वेळी केले. ठाणे महापालिकेनेही कट्ट्याच्या पुनर्उभारणीस मदत करावी. महापालिकेने अभिनय कट्ट्याच्या जागेत कलाभवनच्या धर्तीवर वास्तू उभारावी, अशी सूचनाही त्यांनी केली. सामान्य माणसांनी सामान्य माणसांच्या मदतीने उभी केलेली चळवळ पुढे नेण्यासाठी ठाणेकरांनी पुढे यावे, असे आवाहन सबनीस यांनी केले. या वेळी उपस्थित कलाकारांनी मदत करण्याचे, तर कोणी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले.
कट्ट्याच्या पुनर्उभारणीसाठी कलाकारांचे मदतीचे आवाहन, रवी जाधव, विजू माने, अभिजित पानसे, मंगेश देसार्इंसह कलाकारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 3:09 AM