ठाणे : गेल्या काही महिन्यात अभिनय कट्ट्याचे कलाकार म्हणून विविध चित्रपट आणि मालिकांद्वारे झळकत असून कट्टयावर सुद्धा अनेक प्रसिद्ध कलाकार आणि आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावली. मराठी प्रमाणेच हिंदी चित्र-नाट्य सृष्टीत आपली दमदार पावले रोवण्याच्या दिशेने कट्ट्याच्या कलाकारांची घौड दौड सुरू आहे. ३७२ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर कलाकारांच्या या घौडदौडीची मेहनत "फिल्मी चक्कर" द्वारे जबरदस्त रंगली होती.
प्रथेप्रमाणे लक्ष्मी ढसके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले आणि कार्यक्रमास सुरवात झाली.त्यांनतर नवनाथ कंचार आणि संदीप पाटील यांनी १९९८ साली प्रदर्शित झालेल्या "हिटलर" या सिनेमातील जॉनी लिवर यांचा कोर्टातील प्रसंग रंगवला आणि रसिकांच्या टाळ्या लुटल्या. तर कल्पेश डुकरे, शुभांगी गजरे, शिल्पा लाडवंते, प्रशांत सकपाळ, रुक्मिनी कदम, रोहित आयरे व दीपक मुळीक यांनी "बेटा" या सिनेमातील प्रसंग बखुबी निभावत आपल्या कलाकृतीद्वारे उपस्थितांची मने जिंकली. निलेश पाटील याने "शोहरत" सिनेमातील एक प्रसंग आपल्या नाट्यछटे द्वारे सादर केला तर वीणा छत्रे आणि अभिषेक सावळकर यांनी "ऍक्शन रिप्ले" या सिनेमातील एक प्रसंग प्रेक्षकांसमोर आपल्या सादरीकरणातून रिप्ले केला. दीपक मुळीक याने " मिस्टर बिन" सादर केला तर गणेश गायकवाड याने "मंटो" चित्रपटातील एक प्रसंग सादर केला. सरतेशेवटी विश्वजित वाघ याने "रट्टी पट्टी" या गाण्यावर वर आधारित गाण्यावर दिलखेचक नृत्य सादर केले. तसेच कल्पेश डुकरे याने " कलाकार " हि एकपात्री सादर केली. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा कदिर शेख यांनी लीलया सांभाळली.