ठाणे : महाराष्ट्रात पहिल्या बाकावरील पक्ष बाहेर आहे, मात्र दुस-या, तिस-या आणि चौथ्या बाकावरील पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. ज्या सरकारकडून अद्याप मंत्र्यांचे खाते वाटपही होऊ शकलेले नाही. जो तो पक्ष आपल्याला मलाईदार खाते मिळावे यासाठी भांडतांना दिसत असल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय महासचिव खासदार अरुण सिंह यांनी केला आहे. त्यामुळे महिनाभरातच हे सरकार जनतेसाठी काय करणार आहे, हे सर्वाना समजणार आहे. परंतु भाजपामध्ये विरोधी पक्षाची भूमिका योग्य प्रकारे बजावेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केले. सध्या देशात जीडीपीचा स्तर खाली आला आहे, हे त्यांनी यावेळी मान्य केले. मात्र येत्या दोन महिन्यात तो पुन्हा उसळी घेईल, असा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे राज्यस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसच्या हाती सरकार गेल्यानंतर या ठिकाणाच्या सर्व योजना बंद करण्याचे काम त्यांनी केले आहे. या राज्यांमध्ये रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे काँग्रेसच आहे. मात्र आपल्या चुका लपविण्यासाठी ते केंद्रातील भाजपा सरकारवर आरोप करीत आहे.
या तीन राज्यांप्रमाणोच महाराष्ट्राची देखील हीच अवस्था होणार असल्याचे भाष्य त्यांनी यावेळी केले. तुमचे सरकार आहे, तर मग रोजगार निर्मिती करण्याचा अधिकार तुमचा आहे, उगाच केंद्र मदत करीत नाही, म्हणून टीका करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या 8 जानेवारीला रोजगार आणि इतर महत्वांच्या कारणांसाठी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेनेही सहभागी होणार आहे, यावर त्यांना छेडले असता, शिवसेनेपुढे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांना सत्ता टिकवायची आहे, यामुळेच ते या बंदमध्ये सहभागी होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. वास्तविक पाहता, राज्यात तुमची सत्ता असतांना मागील 40 दिवस मंत्री पद मिळविल्यानंतर अद्यापही खाते वाटत करण्यात आलेले नाही. केवळ मलाईदार खाती मिळावीत म्हणून सध्या या तीनही पक्षांमध्ये भांडणे सुरु आहेत. त्यामुळे ते राज्याचा विकास काय करणार, हे न सांगितलेच बरे असा टोलाही त्यांनी लगावला.
दुसरीकडे नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. हा देशातील कोणत्याही नागरिकाच्या विरोधातील कायदा नसून त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. विरोधक केवळ बाऊ करीत असून चुकीचा प्रचार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या 15 दिवसात देशातील 3 कोटी जनतेपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचण्याचा आमचा आता प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.