ठाणे : ज्या क्रुझवर अमली पदार्थांची पार्टी झाली त्यात चार हजार जणांचा समावेश होता. मात्र, त्यांतील फक्त सहाजणांनाच अटक कशी होते? उर्वरित ३९९४ जण कुठे आहेत, त्यांना का सोडले? असा सवाल राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केला. आव्हाड यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे असून, त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींतदेखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्रुझ ड्रग्ज पार्टीवरून सध्या महाराष्ट्रात चांगलेच वादळ पेटले आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यात आता आव्हाड यांनी केलेल्या दाव्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले आहे. ज्या क्रुझवर पार्टी झाली त्यातून सहाजणांना अटक केली. त्या ठिकाणी सहा ग्रॅम अमली पदार्थ सापडले. त्यावरून रान पेटवले जात आहे. परंतु, ज्या ठिकाणी तीन हजार कोटींचे अमली पदार्थ सापडले, त्यावर काही का बोलत नाही? असा सवाल केला.
इतिहास काढला तर महागात पडेल !वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी माझ्या महाराष्ट्रात मला धमकी दिली जात आहे, जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर आव्हाड यांना छेडले असता ‘रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवे,’ असा सल्ला देतानाच ‘आम्ही जर का इतिहास काढला तर महागात पडेल,’ असा इशाराही दिला. अर्धांगिनी म्हणून ती तिचे कर्तव्य पार पाडत असल्याचे म्हणाले.
मुनगंटीवारांच्या धैर्याचे कौतुकभाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी असे अनेक दाखले बनावट निघतात, वानखडे यांचेही त्यातील एक असावे, असे सांगितले आहे. यावर आव्हाड यांनी मुनगंटीवार हे जर त्यांच्या खोट्या दाखल्याचे समर्थन करीत असतील, तर त्यांच्यासारख्याच्या धैर्याचे कौतुक असल्याचेही ते म्हणाले.