ठाणे : आपल्या वडिलांसोबत लहानपणापासून गणेश मूर्ती बुकिंग करायला जाणारा चिमुकला आर्यन मूर्तीचे निरीक्षण करीत बाप्पा साकारू लागला. दरवर्षी गणेशोत्सवात मूर्ती बनविणाऱ्या अवघ्या १२ वर्षाचा आर्यन सध्या लॉकडाऊनचा काळ सार्थकी लावतोय. सध्या ऑनलाइन अभ्यास सुरू असल्याने उरलेल्या वेळात निरीक्षण केलेल्या बाप्पाचे त्याने तीन मूर्ती घडविल्या आहेत. या मूर्ती विसर्जन करून पुन्हा त्याच मूर्तीपासून तो बाप्पा बनविणार असल्याचे त्याने सांगितले. त्याने परिसरातील वागळेचा विघ्नहर्ताही आपल्या चिमुकल्या हातांनी साकारला आहे.
ठाण्यातील आर्यन सावंत हा सेंट जॉन बाबटिस्ट सारख्या इंग्लिश माध्यम शाळेत सातवी इयतेत शिकत आहे. कोणतीही गणेश मुर्ती असो ती फक्त बघून आपल्या हाताने मातीला आकार देणारा हा अवलिया वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गणेश मुर्ती बनवू लागला. घरातुन नेहमीच त्याच्या कलेला वाव मिळाला. आर्यनचे वडील समीर सावंत हे गेली कितेक वर्षे गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सोबत मुर्ती बुक करायला कार्यशाळेत जाताना नेहमीच तो सोबत असायचा मूर्तिकारांसोबतचे संभाषण तो काळजी पूर्वक ऐकायचा, सोबतच तेथील मुर्तिकार मुर्ती कशी साकारतात हे काळजी पूर्वक बघायचा, मग हळू हळू तो तेथील माती घरी घेवून यायला लागला व कारखान्यात पाहिलेली मूर्ती घरी मातीत उतरवु लागला.
सुरुवातीला बनवलेल्या गणेश मुर्ती व त्याच्या कलेला त्याची आई समृद्धि सावंत यांनी दिलेली प्रेरणा व पाठीम्बा या चिमुकल्याला वरदाई ठरला. या ९ वर्षाच्या काळात आर्यनने अनेक गणेश मुर्ती साकारल्या या कलेचे विभागातील लोकांनी नेहमीच त्याचे कौतुक केले. शाडूची माती बारीक़ करनणे, ती चाळुन घेणे, तीला ओली करून व्यवस्थित मळणे ही कामे आर्यन अत्यंत व्यवस्थित पार पाड़तो. यापुढे जावुन त्याला खुप शिकून आर्टिस्ट बनायचे आहे असे त्याने सांगितले. या पूर्वी त्याच्या कामाचे कौतुक दिवंगत मुर्तिकार खातू ,स्केच आर्टिस्ट विकी साळस्कर,प्रसिद्ध मुर्तिकार राहुल झुंझारराव यांनी देखील केले आहे. गणेशमूर्ती घडविताना मला खूप प्रसन्न वाटते असे आर्यनने सांगितले.