नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: केंद्र शासनाच्या वतीने स्क्रॅप धोरणांतर्गत शासकीय कार्यालयातील शासनाच्या मालकीच्या १५ वर्षे वयोमान झालेली वाहन मोडीत काढण्याच्या निर्णयाचा फटका भिवंडी महानगरपालिका मालकीच्या ४६ वाहनांना बसला आहे.महापालिकेतील ७८ वाहनांनापैकी ४६ वाहन भंगारात निघाल्याने आता आपली दैनंदिन गरज भागविण्यासाठी पालिका प्रशासनाची मदार भाडेतत्त्वा वरील वाहनांवर आहे.
महापालिकेतील ५ कार,५ जीप,१३ डंपर,९ टँकर,२ जेटिंग वाहन ,१ सक्शन वाहन,१ स्काय लिफ्ट,५ अग्निशामक वाहन,२ रुग्णवाहिका,१ जेसीबी, १ पोकलेन,१ पीच रोलर अशा ४६ वाहनांवर नव्या धोरणाने वापरण्यावर गंडांतर आले आहे.
त्यामुळे उर्वरित ३२ वाहनांमध्ये जीप कार अग्निशामक दलाची वाहने, रुग्णवाहिका अशा शिल्लक राहिल्याने शहरात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरातील काही भागात पाणी टंचाई भासत असल्याने टँकर व प्रभाग समिती निहाय अतिक्रमण कामांवर कारवाई करण्यासाठी डंपर उपलब्ध नसल्याने पालिकेच्या वाहन विभाग कडून तींन टँकर , तीन डंपर भाडे तत्वावर घेण्यात आल्याची माहिती वाहन विभाग प्रमुख शेखर चौधरी यांनी दिली आहे. आरोग्य विभागा कडून काही डंपर व एक जेसीबी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकत घेण्यात येणार असल्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. या भाडेतत्त्वावरील वाहन घेताना बऱ्याच वेळा पालिका प्रशासना सोबत हातमिळवणी करून पालिकेतील कर्मचारी काही संस्थांच्या नावे ठेका मिळवून आर्थिक भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"