मीरारोड - भाईंदर मधील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील २१ पैकी तब्बल १२ वातानुकूलित शवपेट्या नादुरुस्त असून यामुळे मृतदेह ठेवण्यात मोठी अडचण होऊन वाद होत आहेत. मीरा भाईंदर महापालिका प्रशासन आणि राजकारणी यांनी महापालिकेच्या खर्चातून बांधलेले भाईंदरच्या टेम्बा येथील भीमसेन जोशी रुग्णालय चालवणे खर्चिक असल्याचे सांगून शासनाला हस्तांतरित केले. परंतु शासनाच्या ताब्यात जाऊन देखील इतके मोठे २०० खाटांचे रुग्णलाय गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा नसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. शिवाय कंत्राटी कमर्चाऱ्यांना तीन तीन महिने पगार मिळत नसल्याने मिळत असलेली तुटपुंजी आरोग्य सेवा देखील विस्कळीत होत आहे.
रुग्णालयाच्या आवारातच शवविच्छेदन केंद्र व वातानुकूलित शवागार आहे. परंतु शवागार मधील २१ पैकी तब्बल १२ शवपेट्या ह्या नादुरुस्त झाल्याने बंद आहेत. त्यातील ३ शवपेट्या तर दुरुस्त होण्यासारख्या नसल्याने त्या निकामी करण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. मीरा भाईंदर मध्ये होणाऱ्या रस्ते अपघात वा अनोळखी मृतदेहांना ठेवण्यासाठी सदर शवागार उपयुक्त ठरते. शिवाय शहरातील नागरिकांना देखील त्यांच्या नातलगांचे निधन झाल्यावर अंत्यविधीसाठी विलंब होणार असेल तर शवागार महत्वाचे ठरते. शिवाय शहरा बाहेरून देखील मृतदेह ठेवण्यासाठी शवागारात येत असतात.
परंतु गेल्या काही महिन्यात तब्बल १२ वातानुकूलित शवपेट्या नादुरुस्त झाल्याने केवळ ९ शवपेट्याच वापरात आहेत. त्यामुळे अनेकवेळा मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याने कर्मचारी आदींना देखील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. परंतु शासकीय अधिकाऱ्यां कडून या कडे गांभीर्याने पहिले जात नसल्याने इतक्या मोठ्या संख्येने शवपेट्या नादुरुस्त झाल्या असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वास्तविक महापालिकेच्या मीरारोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात देखील शवागार बनवण्यात आले होते. मात्र ते बंद करण्यात आल्याने भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातील शवागार वर ताण पडत आहे.