जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ज्युपिटर हॉस्पिटल येथून भाईंदर पाडा येथे निघालेले कारचालक डॉ. तारीक मन्सुरी यांचा ताबा सुटून कार मेट्रोच्या दुभाजकाला जाऊन धडकली. या घटनेत मन्सुरी यांना फारशी दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ घडली. या अपघाताचा वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता, अशी माहिती आपत्ती वाहतूक नियंत्रण शाखेने दिली.
ही कार रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर आणि त्या कारमधील सांडलेल्या तेलावर माती पसरवल्यावर ठाणे - घोडबंदर रोड वाहतुकीसाठी सुरळीत झाला. घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ अपघात झाल्याची तसेच या अपघाताचा वाहतुकीवर परिणाम होत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांसह ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली हाेती.
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी वाहतूक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. ठाणे-घोडबंदर वाहिनीवरील वाहतूक सुमारे अर्धा तास धीम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर कारमधील पसरलेल्या तेलावर माती टाकल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मेट्रोच्या दुभाजकाला कामादरम्यान सुरक्षिततेसाठी लावलेल्या पत्र्याला जाऊन कार धडकली होती. यावेळी डॉ. मन्सुरी हे एकटेच प्रवास करत होते. ते सुखरूप असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.