कल्याण : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केडीएमसीत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांनी मानधन वाढवून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या वेळी त्यांनी साहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्वयंसेविकांनी स्पष्ट केले.
ठाणे, पालघर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन लाल बावटा संलग्न यांच्यातर्फे आशा स्वयंसेविकांच्या मागणीसाठी कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. महापालिकेत २०१५ पासून १०७ आशा स्वयंसेविका तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत. घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाचे काम या स्वयंसेविका करत आहेत. कोरोना काळात सुरक्षिततेची कोणतीही साधने पुरविली जात नसल्याने त्यांनाही बाधा होण्याची भीती आहे. असे असतानाही त्या जीवावर उदार होऊन अल्प मानधनात सेवा देत आहेत.
त्यामुळे प्रत्येक स्वयंसेविकेला दरमहा १० हजार रुपये मानधन, प्रत्येकास ५० लाखांचे विमा कवच, तसेच एखाद्या स्वयंसेविकेला कोरोना झाल्यास तिच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार व्हावेत, अशी मागणी स्वयंसेविकांनी केली होती. मात्र, त्याची दखल घेतली न गेल्याने त्यांनी १७ जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचीही प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी मंगळवारी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला.
स्वयंसेविकांचे शिष्टमंडळ साहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले नाही. कोणतेच आश्वासन न मिळाल्याने काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्वयंसेविकांनी स्पष्ट केले आहे.
‘आम्हालाही हमी द्या’
महापालिकेने नर्स भरतीची प्रक्रिया सुरू केली होती, तेव्हा आरोग्य अभियनांतर्गत कार्यरत असलेल्या नर्सनी ठिय्या आंदोलन केले होते. तेव्हा त्यांना मानधन वाढवून देण्याची हमी महापालिका प्रशासनाने दिली होती. तशीच हमी आम्हाला का दिली जात नाही, असा सवाल आशा स्वयंसेविकांनी केला आहे.