उल्हासनगर : कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर्सच्या मानधनात प्रतिदिन ३०० रुपये व महिन्याला ९ हजार वाढ करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र अद्यापही आशा वर्कर्सना दमडी मिळाली नसल्याचे उघड होऊन, वाढीव मानधन देण्याची मागणी निवेदनद्वारे समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आयुक्तांना केली आहे.
उल्हासनगरात १२० पेक्षा जास्त आशा वर्कर्स कोरोना महामारीत घरोघरी सर्वेक्षण करीत आहेत. कोरोना संसर्गाची भीती असताना स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर्स यांना पीपीई किट्स, सॅॱनाटाईजर, हंन्डग्लोज आदी संरक्षणात्मक साहित्यासह मानधनात वाढ करण्याची मागणी झाली. दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा वर्कर्स यांच्या व्यथा व मागण्या एकूण घेतल्यावर दरमहा ९ हजार व प्रतिदिन ३०० रुपये मानधनात वाढ करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. तसेच याबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून आशा वर्कर्स यांचा प्रश्न मांडला होता. शासनाकडून आशा वर्कर यांना फक्त प्रतिमाह 1 हजार मानधन मिळते.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही गेल्या तीन महिन्यानंतर आशा वर्कर्स यांना वाढीव मानधन दिले नसल्याचे उघड झाले. अखेर समाजसेवक शिवाजी रगडे यांनी महापौर लीलाबाई अशान यांच्या सोबत चर्चा करून पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली.तसेच महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना निवेदन दिले आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या मुजोर अधिकर्यांचा निषेध यावेळी करण्यात आला आहे. याबाबत महापालिका मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.