सदानंद नाईक, उल्हासनगर :ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती. सकाळी कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सहपत्नी मंदिराची पूजा केल्यानंतर विठ्ठल भक्तांना मंदिर खुले केले.
उल्हासनगर येथील शहाड बिर्ला मंदिर जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असून जे वारकरी व विठ्ठल भक्त पंढरपूरला जात नाही. ते आवर्जून शहाड बिर्ला विठ्ठल मंदिराला दर्शनासाठी येतात. तसेच शहरातून व ग्रामीण परिसरातून असंख्य दिंड्या याठिकाणी येतात. मंदिर संच्युरी कंपनीच्या मालकीचे असल्याने, कंपनीच्या वतीने पहाटे साडे सहा वाजता कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सहपत्नी पूजा केली. यावेळी आमदार कुमार आयलानी, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, कंपनी उपाध्यक्ष ओ आर चितलागे, सुबोध दवे, युनिट हेड दिग्विजय पांडे, रवी पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह, कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका आदीजन उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. तर साफसफाई व इतर व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आई होती. सेंचुरी रेयान कंपनी, बी.के. बिर्ला महाविद्यालय, बी.के. बिर्ला रात्रकालीन महाविद्यालय, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल तसेच सेंचुरी रेयॉन हाईस्कूल द्वारा बिर्ला कॉलेज कल्याण ते बिर्ला विठ्ठल मंदिर दरम्यान ज्ञान दिंडी काढण्यात आली. दिंडीत ढोल-नगाड़े, वारकरी पथक, विविध देखावे, स्वच्छता बाबत जनजागृती, भजन मंडळी यांच्यासह शालेय मुले, शिक्षक यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. कॉलेजचे आजी व माजी प्राचार्य यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शालेय मुले ज्ञान दिंडीत सहभागी झाले होते.
शहर पूर्वेतील ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्यासह अन्य भागातून दिंड्या निघाल्या होत्या. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेवर येऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनो. असे साकडे विठ्ठल चरणी घातल्याची माहिती धनंजय बोडारे यांनी दिली. बिर्ला विठ्ठल मंदिरात सकाळ पासूनच विठ्ठल भक्तानी एकच गर्दी केली होती.