ठाणे : येऊर येथील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात रात्री बेरात्री प्रखर प्रकाशझोतात तसेच लाऊडस्पीकर लावून चालणाऱ्या खेळांना तसेच लग्नसमारंभाना आता आळा बसणार आहे. किंबहुना त्यावर बंदी घालण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यानुसार येथील तीन टर्फ क्लबच्या मालकांना नोटिसा धाडल्याची माहिती येऊर परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. त्यामुळे येथे रात्रीच्या अंधारात चालणाºया पार्ट्यांना आता लगाम बसणार आहे.
वनविभागने येऊरला मॉर्निग वॉकसाठी जाणाऱ्यांसाठी पास सुरू केले आहेत. त्यानंतर आता येथील टर्फ क्लबलाही नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिकांचेही दाबे दणाणले आहेत. या टर्फक्लबबाबत येऊर येथील स्थानिकांनी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन तसेच वन अधिकाºयांकडे गेले काही महिने सतत पाठपुरावा केला होता. त्यास न्याय मिळाल्याने येऊर ग्रामस्थ आनंदात आहेत.
प्रखर प्रकाशझोतामुळे व गोंगाटामुळे वन्यजीवांच्या हालचालींवर निर्बंध येतात, तसेच ते वाट चुकतात. अलीकडेच बिबट्याच्या मादीने तिचे पिल्लू रस्त्याच्या कडेला आणून ठेवले होते. त्यावरून वन्यजीवन हे रात्रीच्या खेळांमुळे व पार्ट्यांमुळे कसे विस्कळीत झाले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या वनविभागाने तातडीने पावले उचलत या टर्फ क्लबना नोटिसा धाडल्या आहेत.
यापुढे अनधिकृत हॉटेल व रेस्टॉरंटवरही अशाच प्रकारच्या कारवाईचे स्पष्ट संकेत वनविभागाच्या या नोटिसींमुळे दिसत असल्याने अवैध धंदे चालविणाºयांचे धाबे दणाणले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन टर्फ क्लबला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. रात्री १० नंतर कोणताही जमाव करून ध्वनी प्रदूषण करण्यास मज्जाव असणार आहे. रात्री खेळ सुरू राहिल्यास ध्वनी प्रदूषण अधिनियमन २००० अन्वये कठोर कारवाई केली जाईल, असेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
२८४ जणांनी घेतले मॉर्निंग वॉकचे पास
येऊरला मॉर्निंग वॉकला जायचे असेल तर वार्षिक १९५ रुपयांचा पास काढा आणि पहाटे पाचे ते ८ या वेळेत फिरायला जावे लागणार आहे. त्यानुसार आतापर्यंत २८४ जणांनी हे पास काढल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. परंतु, यामुळे कधीही, केव्हाही फिरण्यासाठी येणाºयांचे प्रमाण या पासमुळे घटल्याची माहितीही समोर आली आहे.