ठाणे, दि. 6 - ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (20) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. ठाणे जिल्ह्यात येण्याची त्याला मनाई असताना कोपरीतील सिद्धार्थनगर भागात फिरताना त्याला जेरबंद करण्यात आले.त्याच्याविरुद्ध ठाणे, कल्याण या रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाइल चोरी आणि प्रवाशांच्या जिवाला धोका पोहोचवणे, अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. कोपरी पोलीस ठाण्यातही खुनाच्या प्रयत्नासह हाणामारी आणि चोरीच्या गुन्ह्यांची नोंद त्याच्याविरुद्ध आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी 24 जुलै 2017 रोजी मुंबईसह चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.मात्र, या आदेशाला धाब्यावर बसवून तो कोपरी परिसरात बिनधास्तपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कोर्डे, निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अशोक सावंत, जमादार राजा पाटील, हवालदार दत्ता पालांडे आणि तुकाराम डुंबरे यांच्या पथकाने 5 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोपरीतील महापालिका रुग्णालयासमोरून अटक केली. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती कोर्डे यांनी दिली. ‘‘आशीष गुप्ता याने रेल्वेत प्रवाशांचे मोबाइल चोरण्याबरोबरच प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचेल, अशी कृत्ये केली होती. त्यामुळेच त्याला मुंबई, ठाण्यातून हद्दपार केले होते. त्याच्याविरुद्ध रेल्वेसह कोपरीतही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.’’उत्तम सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस, ठाणे