ठाणे : राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकेमार्फत जी काही लसीकरण केंद्र सुरु आहेत. त्यात सात्यत्य दिसत नाही. लोकांना गोंधळात टाकणारे मेसेज रोजच्या रोज प्रशासनाकडून पाठविले जात आहेत. १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना या लसीकरणाचा लाभ होत नाही. त्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या मदतीने संस्थात्मक रित्या लसीकरण सुरु आहे. त्यामुळे ठाणो महापालिका असो किंवा मुंबई महापालिका यांनी याचा अभ्यास केला पाहिजे अशी टिका भाजपचे नेते तथा ठाणे प्रभारी आशिष शेलार यांनी केली. लसीकरणात महाविकास आघाडीने व्याभीचार केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ठाण्यात भाजपच्या वतीने नगरसेवक संजय वाघुले यांनी आयोजित केलेल्या खाजगी लसीकरणाच्या शुभारंभासाठी आशिष शेलार ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे आरोप केले. मुंबई महापालिकेने रेस्टॉरेन्ट, बार, पबमधील सर्वाचे लसीकरण सुरु केले. मात्र १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण केले जात नाही, परदेशी जाणा:या विद्याथ्र्याना लस दिली जात नाही. याचाच अर्थ हा व्याभीचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिवसात स्वत:च्या पक्षावरील भाषण कमी परंतु शिवसेनेवरील प्रेम अधिक दिसून आले आहे. ते शब्द पाळणारे आहेत, शब्द ठेवणारे आहेत, त्यांचे काम विश्वासदर्शक आहे, त्याचे स्पष्टीकरण आधी राष्ट्रवादीने द्यावे असेही त्यांनी सांगितले. सामना चे अग्रलेख कधीकाळी मनोरंजनात्क, काव्यात्मक , उपहासमात्मक होते, परंतु आता ते केवळ कल्पो कल्पीत आहेत. त्याच माध्यमातून अग्रलेखात विमान चढवयाचे आणि उतरवायचे या पलीकडे काही नसल्याची टिकाही त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली. त्यामुळे स्वत:चा पक्ष तरी संजय राऊत यांनी सांभाळला तरी ठिक आहे. एवढाच त्यांना सल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.
दि. बा. पाटील यांच्या नावाच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, शिवसेनेकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नावे दिले आहे. आमचा त्यांच्या नावाला विरोध नाही. परंतु, ते कशा पध्दतीने किती ठिकाणी आणि सर्वसमावेशरित्या घेतले तर बरे हीच आमची सुचना असल्याचेही त्यांनी सांगितले. दि. बा. पाटील यांचे कार्य हे स्पृहणीय आणि सामान्य माणसाच्या लढय़ाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी विमानतळ उभे राहत आहे, त्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी केली जात असेल तर त्याला आमचा विरोध असणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने त्यांना छडले असता, आधी महापालिका निवडणुका जाहीर करण्याचे धारीष्ट तरी शिवसेनेने दाखवावे अशी टिका त्यांनी केली. कधी निवडणुक मुदतपूर्वक घेण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केला. आता मुदत संपल्यानंतर त्याला प्रलंबित करता येईल काय यासाठी शिवसेनेचा प्रयत्न सुरु असल्याची टिकाही त्यांनी केली. शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, निवडणुक आयोगाला विनंती आहे, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन निवडणुका जाहीर कराव्यात. या निवडणुकीत शिवसेनेला चारी मुंडय़ा चित करण्याचे काम भाजप करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पावसाळा आला की पाणी तुंबणो आलेच, सर्वसामान्य मुंबईकरांना दरवर्षी एक नवीन गाजर देण्याचे काम शिवसेनेकडून होत आहे. हे गाजर विकण्याचे काम शिवसेना मुंबई आणि ठाण्यात करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यापूर्वी देखील करुन दाखवला नावाचे गाजर दाखवले, आणि प्रत्यक्ष पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर आम्ही पाणी तुंबणार नाही, असे कधी बोललोच नव्हतो. असे पळून दाखविण्याचे काम शिवसेनेकडून सुरु आहे. मुंबई आणि ठाण्यात मागील २५ वर्षे सत्ता भोगल्यानंतर, जनतेच्या हाती काय लागले तरनव नवीन स्थानी पाणी साचण्याचे कार्यक्रम होत आहेत. मुंबईत १ हजार कोटी तर ठाण्यात अशा पध्दतीने ५०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हे पाप शिवसेना कुठे फेडणार असा टिकाही त्यांनी यावेळी केली. मुंबईतील मालाड भागात घडलेल्या घटनेनंतर याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, कधी घोषणा केल्या जातात अनाधिकृत बांधकामांवर करडी नजर ठेवतो, कधी मी मुंबईकर अभियानातून अनाधिकृत बांधकामांवर पालिका आणि पोलीसांना दिले आहेत, त्यांच्याकडून कचराई झाली तर कारवाई केली जाईल, आता तर जीपीएसद्वारे लक्ष ठेवणार असे सांगितले जात होते. मात्र, हे सर्व गेले कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अनाधिकृत बांधकामात महाविकास आघाडीचा हात दिसून असून मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडीकडून योग्य प्रकारे हातळला गेला नाही, त्यामुळे त्यांना ते टिकविता आलेले नसल्याची टिकाही त्यांनी केली. त्यामुळे आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना भाजपचा पाठींबा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.