ठाणे: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने मराठी ग्रंथसंग्रहालय,ठाणे येथे र 'वर्षा काव्यमहोत्सव" आयोजित करण्यात आला होता.याचे उद्घाटक सिने दिग्दर्शक शिरीष राणे यांनी केले. तर अध्यक्षपदी हास्य कवी अशोक नायगावकर आणि विशेष वक्ते म्हणून कविवर्य अशोक बागवे उपस्थित होते.
डायरेक्टर इन्फ्राटेक - एटी ऑईल व सिने निर्मात्या अलंक्रिता किशनराव राठोड यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. तसेच कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर व कार्यवाह शशिकांत तिरोडकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. या काव्यमहोत्सवात ज्येष्ठ कवी अशोक बागवे, यांनी आठवणीतील अशोक नायगावकर यांच्याबद्दल आपल्या खास विनोदी शैलीत किस्से सांगत चिमटे घेत, कोपरखळ्या मारत रसिकांना पोट धरून हसवले. समारोपाच्या या कार्यक्रमात अशोक नायगावकरांच्या अध्यक्षीय भाषणानं वेगळीच रंगत आणली. कवी अशोक नायगावकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत कवींना मंत्रमुग्ध केलं. हास्यातून बरोबर मर्मावर बोट ठेवत प्रेक्षकांमध्ये हशा पिकवण्याचं काम कवी अशोक नायगावकर यांनी केलं,मधुसुधन नानिवडेकर,महेश केळुसकर,अनुराधा नेरूरकर यांच्यासह शिवाजी गावडे,कमलाकर राऊत,मकरंद वांगणेकर,सुवर्णा जाधव,स्नेहाराणी गायकवाड, सुनील पवार,कविता मोरवणकर, लता गुठे,रजनी निकाळजे ,कविता राजपूत ,छाया कोरेगावकर व सुनिता रामचंद्र या निमंत्रित कविंनी सामाजिक,पर्यावरण प्रेम ,शृंगार अशा विविध विषयावरील कविता सादर केल्या.भावविभोर करणा-या कविता सादर करून भावनांचे अनोखे रंग टिपले.तर तरुण कवींनी ,रसिकांनी ही भरभरून उत्स्फूर्त दाद दिली.या कार्यक्रमाला रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. काव्यमहोत्सवाच्या प्रास्ताविकात कोमसापच्या अध्यक्षा मेघना साने यांनी तरूणांतील उत्तम कवींना व्यासपीठ मिळवून देणं हा उद्देश व्यक्त केला. त्यानुसार काव्य स्पर्धेतील कविंना मान्यवरांच्या बरोबरीने कविता सादर करता आल्या. त्याअनुषंगाने घेतलेल्या काव्य स्पर्धेत ययाती सोनवणे(प्रथम),ओंकार मोहिले (द्वितीय) व सुशांत भालेराव यांना(तृतीय) तर मानसी कुलकर्णी,संकेत म्हात्रे व अंजली सुरोशे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा बोर्डे व सतीश सोळांकुरकर यांनी केले.