प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कलासरगम या नाट्यसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा ४ मे ते ७ मे रोजी ठाणे शहरात रंगणार आहे. ४ मे रोजी दुपारी ४ वा. गडकरी रंगायतन येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मोहन जोशी, आशुतोष गोवारीकर, मनोज जोशी, सुहास जोशी, अलका आठल्ये, वर्षा उसगावकर, अभिराम भडकमकर, अशोक पत्की आदी या सोहळ्याला विशेष उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात कलासरगमचे नाटककार आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचा सत्कार होणार आहे, अशी माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कलासरगमचे हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे असून याचवर्षी या संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ रंगकर्मी कुमार सोहोनी यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ४ मे रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात नाट्य, चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा सत्कार होणार आहे. तसेच, यंदाच्या दिल्ली नाट्य महोत्सवात गाजलेले, सोहोनी दिग्दर्शित आणि भडकमकर लिखित ‘याच दिवशी ईसी टाईम’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. शुक्रवारी ५ मे रोजी सायंकाळी ६ वा. हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक, तीन हात नाका येथे सोहोनी दिग्दर्शित गिल्टी चित्रपटाचा खेळ होणार आहे. त्यानंतर समिहा सबनीस लिखित-दिग्दर्शित आणि अभिनीत सोलकढी हा लघुपट दाखविला जाणार आहे. शनिवार ६ मे रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील मिनी थिएटर येथे दुपारी ४ वा. कलासरगमचे कलाकार आणि दिग्दर्शक प्रा. डॉ. विजय जोशी हे सोहोनी यांची मुलाखत घेणार आहे. रविवार ७ मे रोजी दुपारी ४ वा. मिनी नाट्यगृह, डॉ. कशनाथ घाणेकर नाट्यगृह येथे बागवे यांचा सत्कार होणार असून डॉ. उदय निरगुडकर हे त्यांच्याशी संवाद साधणार आहे.
यावेळी कलासरगमचे सदस्य बागवे यांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी आणि शर्वरी कुलकर्णी या मायलेकी नाट्यविष्कार सादर करणार आहे. या पत्रकार परिषदेला सोहोनी, आ. संजय केळकर, जोशी, सुभाष काळे, नरेंद्र बेडेकर उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"