- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीआधुनिकतेची कास धरत आश्रमशाळेचा दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यातील दोन आश्रमशाळांनी मानांकन पटकावले. काही वर्षापासून सतत बातमीत असलेल्या राज्यातील काही आदिवासी शाळांनीही आपले रूपडे बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आदिवासी मंत्रालयातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्याचबरोबर आश्रमशाळेचा कायापालट करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाने प्रयत्न सुरू केले आहेत. आश्रमशाळेविषयी अभिमान वाटावा अशी कामे होऊ लागली आहेत.आदिवासी विकास विभागात कायापालट मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार भिनार व चिंबीपाडा सरकारी आश्रमशाळा या आदिवासी मुलांच्या शाळेत कायापालट मोहीम राबवण्यात आली. दोन्ही शाळा तालुक्यातील दुर्गम भागात असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत शालेय परिसर स्वच्छता, शालेय सजावट, शाळा रंगरंगोटी, हॅन्डवॉश, वर्ग सजावट, क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. भिनार शाळेत परसबाग तयार केली असून त्यामध्ये मिरची, वांगी, टोमॅटो, मेथी, पालक, शापू आदी भाजीपाला पिकविला जातो. या आश्रमशाळेतील दोन कूपनलिकांना बाराही महिने धोधो पाणी असते,अशी माहिती मुख्याध्यापक जयंत विशे यांनी दिली. तेच पाणी भाजीपाला पिकविण्यासाठी व आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलांना पिण्यासाठी वापरले जातो. तर आश्रमशाळेतील परसबागेत पिकविलेला भाजीपाला मुलांच्या जेवणासाठी वापरला जातो. त्यामुळे स्वावलंबनाची जाणीव मुलांमध्ये करून देण्यात येते. तसेच शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेत वारली, मल्हारकोळी, कातकरी, म. ठाकूर यांच्यासह इतर जातीजमातीची मुले-मुली शिक्षण घेत आहेत. पाच एकरमध्ये सुरू असलेली भिनारच्या आश्रमशाळेतील वसतिगृहात १४८ मुले व १६२ मुली शिक्षण घेत आहेत. तर परिसरातील २०० विद्यार्थी याच मुलांबरोबर शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपासून दहावीच्या परीक्षेत ९० ते १०० टक्के निकाल लागत असल्याची दखल यानिमीत्ताने घेण्यात आला.चिंबीपाडा आश्रमशाळेत शालेय परिसर स्वच्छ करून सजावट करण्यात आली आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा चार वर्षे १०० टक्के निकाल असे विविध नाविन्यपूर्ण उपक्र म राबवण्यात आले. त्याची दखल घेत आयएसओ मानांकन प्राप्त झाले.चांगला विद्यार्थी घडविला जात आहेकधी अनुदानामुळे अथवा इतर गैरसोयींच्या कारणाने आदिवासी आश्रमशाळा दुर्लक्षित होत होत्या. दुर्गम भागातील आश्रमशाळांचे या निमित्ताने बदलेले रूप पाहता परिसरातील गोरगरीब व आदिवासींना आश्रमशाळेचे आकर्षण निर्माण झाले आहे. अशा मानांकन मिळालेल्या आश्रमशांळातून मिळालेल्या संस्कारातून शिक्षण घेऊन निघालेला आदिवासी विद्यार्थी पुढे पदवी शिक्षण घेत आहे.
आश्रमशाळाही आता कात टाकू लागल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:28 PM