वाडा : या तालुक्यातील आमगाव येथील शासकीय आश्रमशाळेची अत्यंत दुरावस्था झाली असून गेली १२ वर्षे या शाळेला स्वत:ची इमारतच नसल्याने भाड्याच्या वेगवेगळ्या घरात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते आहे.
समाजातील दुर्बल, आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना आखते; परंतु त्याची योग्य अंमलबजावणी कशी होत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमगांव येथील आदिवासी आश्रमशाळा. अत्याधुनिक तर सोडाच, पण येथील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही योग्य पद्धतीने पुरविलेल्या नाहीत. तालुक्यातील आमगाव या गावात शासकीय आश्रमशाळा २००६ असून सुरू असून तीमध्ये पहिली ते नववी साठी १७० मुली तर १८० मुलं शिक्षण घेत आहेत. शाळेला अद्यापही स्वत:ची इमारत नसून यामुळे विदयार्थी मात्र गावात असलेल्या ६ वेगवेगळ्या घरात एखाद्या रेल्वेच्या डब्ब्यात बसावे अशा अवस्थेत राहतात. या शाळेत ३३ विविध पदे मंजूर आहेत त्यातील अवघी १३ पदे भरलेली आहेत या व्यतिरिक्त ७ कर्मचारी रोजंदारीवर आहेत.
विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतात त्याच घरातील खोल्यांमध्ये वर्ग असून तिथेच फरशीवर बसून शिक्षणाचे धडे गिरवतात. खेळायला मैदान नाही की मोकळे वातावरण नाही त्यामुळे शिक्षणाचा अगदी बट्टयाबोळ झालेला स्पष्ट जाणवतो. मुलांना पिण्यासाठी कुठलेही प्रक्रिया केलेले पाणी नाही त्यामुळे शेजारी असलेल्या विहीर व बोअरवेलचे पाणी थेट मुलांना प्यावे लागते. शौचालय व अंघोळ व कपडे धुण्यासाठी याच विहिरीचे पाणी ओढावे लागते.
शाळेला इमारत बांधण्यासाठी जागा घेण्यात आली आहे. २०१० ला निधीही प्राप्त झाला होता मात्र माशी कुठे शिंकली याची कुणालाही खबर नाही त्यामुळे दरमहा भाड्यापोटी जवळपास ५० हजार खर्च करावा लागतो. शाळेत विद्युत मीटर कुठेही नसल्याने हुक टाकून विजेची चोरीच करावी लागते. अशा एक ना अनेक समस्यांनी आमगाव आश्रमशाळा अक्षरश: गांजून गेली असून विदयार्थी येथे कसे शिक्षण घेतात व येथील कर्मचारी विद्यार्थ्यांना कसे सांभाळतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक, मात्र आदिवासी विकास विभागाच्या या ढिसाळ व कुचकामी भूमिकेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पिढ्या मात्र वाया जात आहेत असे स्थानिक संतापाने सांगतात.
राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा वाडा तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्याच तालुक्यातील आश्रमशाळा इमारतीविना आपला शिक्षणाचा गाडा हाकते आहे ही शरमेची बाब आहे व या गंभीर प्रकाराची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
आमगाव आश्रमशाळेला स्वत:ची जागा असून येथे इमारत उभारणीला मंजुरी प्राप्त झाली आहे याबाबत निविदा प्रक्रिया सुरू आहे. ती होताच इमारत उभारणी सुरू होईल शिवाय रिक्त जागांबाबत देखील प्रक्रि या सुरू आहे.- आर.ए. गुजर, ए. पी.ओ., आश्रमशाळा विभाग, प्रकल्प जव्हार