लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बँक खात्याच्या अॅटोमेटेड ट्रेलर मशीन (एटीएम) च्या कार्डचा पासवर्ड विचारून एका खासगी बँकेच्या महिला खातेदाराला ३३ हजार ९९७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ठाण्याच्या फुलेनगर भागात घडला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.फुलेनगर येथील एका १९ वर्षीय गृहिणीला २७ मे रोजी दुपारी १ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. फोन करणाऱ्याने एटीएमकार्ड कार्यालयातून बोलत असल्याची त्यांना बतावणी केली. आयसीआयसीआय बँकेचे एटीएम ब्लॉक होणार असल्याचे सांगून त्याने कार्डची माहिती आणि मेसेजवर येणारा वन टाइम पासवर्ड त्यांना विचारला. आपले एटीएमकार्ड बंद होईल, या भीतीने या महिलेने तो पासवर्डही दिला. नंतर, मात्र या भामट्याने त्यांच्या बँक खात्यातील ३३ हजार ९९७ रुपये फसवणुकीने काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २८ मे रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.एल. भापकर याप्रकरणी तपास करीत आहेत.कोणत्याही बँकेतून खातेदाराच्या एटीएम किंवा कोणत्याही पासवर्डची माहिती विचारली जात नाही. यासाठी वारंवार बँकेकडूनही मेसेज पाठवले जातात. तरीही, ग्राहक अशा फोनला बळी पडतात. अशी कोणीही माहिती विचारल्यास ‘आम्ही बँकेत येऊनच माहिती देऊ’ असे बँक खातेदारांनी निक्षून सांगितले पाहिजे. कोणालाही अशी कोणतीही माहिती देऊ नये. -राजन जोशी, मुख्य व्यवस्थापक, लीड बँक, ठाणे
एटीएमकार्डची माहिती विचारून गंडा
By admin | Published: May 30, 2017 5:44 AM