ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या विशेष कोविड रुग्णालयांसाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, तेथे शहरातील खासगी डॉक्टर व नर्सला सक्तीची सेवा करण्याचा आदेश काढावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचे सातत्याने रुग्ण आढळत असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील महापालिका-नगरपालिकांनी कोविडसाठी विशेष रुग्णालये उभारली आहेत. मात्र, त्यासाठी डॉक्टर, नर्ससह वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. ठाणे महापालिकेने बाळकूम येथे उभारलेल्या विशेष कोविड रुग्णालयासाठी दहा वेळा वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली. त्याचबरोबर मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली. मात्र, डॉक्टर उपलब्ध होत नसल्याची समस्या गंभीररुप धारण करीत असल्याचे वास्तव डुंबरे यांनी उघड केले आहे.
या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे, याकडे डुंबरे यांनी जिल्हाधिकााऱ्यांची भेट घेऊन या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधत खासगी डाँक्टरांना सेवा देणे सक्तीचे करण्यासाठी मागणी लावून धरली आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात एमडी, एमबीबीएस आणि बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची संख्या मोठी आहे. या डॉक्टरांना महिन्यातील १५ दिवस काम करण्याची सक्ती केल्यास डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील. त्याच पद्धतीने नर्सनाही सरकारी रुग्णालयात हजर राहण्याच्या सक्तीचा आदेश द्यावा, अशी मागणी डुंबरे यांनी केली आहे.पुण्याच्या धर्तीवर अंमलबजावणी करावी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश काढून खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना सरकारी रुग्णालयात काम करण्याची सक्ती केली आहे. अन्यथा, साथरोग कायदा १८९७ व अन्य कायद्यांनुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यातून ५५ वर्षे, आजार असलेल्या डॉक्टरांना वगळण्यात आले आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे.