लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: भिवंडीसह ठाणे जिल्ह्याच्या अनधिकृत शाळा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या अनधिकृत शाळांवर जिल्हा शिक्षण विभागाने त्वरित कारवाई करावी अशी लेखी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी मनसेच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने 'अखेर क्या हुआ तेरा वादा, अनधिकृत शाळा कधी बंद होणार दादा' या आशयाचे स्मरणपत्र चौधरी यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांना सोमवारी देत आपल्या तक्रारींची आठवण करून दिली आहे.विशेष म्हणजे मनसेच्या या अनोख्या स्मरणपात्राची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली असून अनधिकृत शाळा संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान ठाणे जिल्ह्यातील एकूण ३८ अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात ठाणे जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा करून देखील या शाळांवर कारवाई करण्यात जिल्हा परिषद शिक्षण विभाग अपयशी ठरत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने लवकरच शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनविसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी दिली आहे.