सदानंद नाईक
उल्हासनगर: शहरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्या मधील डांबर चोरीला गेल्याची तक्रार मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी सहायक पोलिस आयुक्त यांच्याकडे केली. या अनोख्या आंदोलनामुळे निकृष्ट डांबरीकरण रस्त्याचा भांडाफोड झाला असून महापालिका कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ८ कोटीची तरतूद करून प्रभाग समिती निहाय्य कामाचे ठेके दोन ठेकेदाराला दिले. मात्र काही अपवाद वगळता पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यात आले नाही. परिणामी पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था होऊन, भर पावसात रस्त्यातील खड्डे सिमेंट मिश्रित दगड-रेतीने भरण्याचा केवलवानी प्रयत्न महापालिकेने केला. दरम्यान दिवाळीपूर्वी पाऊस थांबल्या नंतरही रस्ता दुरुस्तीचे व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू न झाल्याने, सर्वस्तरातून एकच ओरड सुरू झाली. तेंव्हा महापालिकेने ४ पैकी दोन प्रभाग समिती अंतर्गत रस्त्याचे काम प्रगतीपथावर तर अन्य दोन प्रभाग समिती अंतर्गत रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाल्याचे परिपत्रक काढले. दरम्यान डांबरीकरण झालेला रस्ता अवघ्या २४ तासात उखळल्याचा प्रकार मनसेने उघड केला.
रस्ता बांधणीतील डांबर चोरीला गेल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी करून खळबळ उडून दिली. शहरातील रस्त्याच्या दुरावस्थामुळे लहान मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आल्याचा आरोप मनसेने यावेळी केला. रस्ता बांधणीतील डांबर चोरीला गेल्याचा पर्दाफाश मनसेने करून त्या चोराला अटक करावी व त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त राठोड यांच्याकडे मनसेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मंगळवारी केली. शिष्टमंडळा मध्ये मनसेचे कल्याण जिल्हा सचिव संजय घुगे, शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह पक्षाचे शालिग्राम सोनावणे, सचिन बेंडके, शैलेश पांडव, अनिल जाधव, मुकेश सेठपलांनी, अनिल गोधडे, सुहास बनसोडे, योगीराज देशमुख, अक्षय धोत्रे, बादशहा शेख, गणेश आठवले, विक्की जिप्सन, मधुकर बागूल, प्रकाश कारंडे, अजय बागूल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"