भिवंडी: काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याच्या दुरुस्तीस व डांबरीकरण कामास अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तसेच शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबई मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.यावेळी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल अशी ग्वाही सुमित म्हात्रे यांना देत दिवाळी ननंतर या रस्त्याचे कंक्रेटीकरणं करण्यात येईल असे आश्वासन दिले होते
अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे गुंदवली,मानकोली,ताडाळी,कामतघर,वळ,पूर्णा,दापोडेया गावांसह काल्हेर ते अंजुर फाटा रस्त्यातील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंजुर फाटा काल्हेर ठाणे मार्गावरून प्रवास करताना तब्बल दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत प्रवाशांना अडकावे लागत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून नागरिक काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याचा वापर करतात. मात्र मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या पाईपलाईनच्या मार्गावर प्रचंड खड्डे पडले होते या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात उपायुक्त विशेष अभियांत्रिकी चक्रधर कांडलकर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता माळवदे, उप जलअभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांची भेट घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सुमित म्हात्रे यांनी काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.
काल्हेर ते ताडाळी मार्गिकेतील या ५.६ कि.मी. रस्त्याचे १२ इंच मापाप्रमाणे कॉंक्रीटीकरण करणे, रस्त्याचे संवर्धनाच्या दृष्टीने वाहतुकीसाठी केवळ हलक्या वाहनांना प्रवेश देणे, रस्त्यादरम्यान असणारे पूल व मोर्या अतिशय कमकुवत झाल्याने त्यांची पुनर्बांधणी करणे यासंदर्भात चर्चा व लेखी मागणी करण्यात आली होती.म्हात्रे यांच्या मागण्यांची दखल घेत अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे अशी प्रतिक्रिया गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली आहे.