ठाणे : मेट्रोच्या कामामुळे, विविध वाहिन्या टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर भागातील सेवा रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. त्यातही मेट्रोचे काम सुरू असल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे येथील मुल्लाबाग ते नागला बंदरपर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या १५ किमी सेवा रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असून,
यावर २३ कोटींचा खर्च होणार आहे. यातील दीड किमीचे काम वगळता उर्वरित काम मेअखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. घोडबंदर रोडवर मेट्रोचे काम सुरू असतानाच येथील सेवा रस्त्यांच्या ठिकाणी गटार, जलवाहिनी टाकण्याचे कामदेखील महापालिकने सुरू केले. त्यानंतर या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली. परंतु, पावसाळ्यात पुन्हा त्यांची चाळण झाली. यामुळे वाहनचालकांना या रस्त्यांचा पर्यायही अपुरा पडत होता. काही दिवसांपूर्वी खासदार राजन विचारे यांनी पाहणी करून सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या निर्देशानुसार आठ दिवसांपासून या सेवा रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. येत्या दोन वर्षांत ते काम पूर्ण होणार आहे. परंतु, ज्या ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या टाकण्याचे काम शिल्लक आहे, ज्या ठिकाणी एमटीएनएलने खोदकाम केले आहे, ते काम नंतर करण्यात येणार असून उर्वरित रस्त्याचे काम मेअखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगर अभियंता रवींद्र खडताळे म्हणाले.
२०१२ चा पुन्हा डांबरीकरणाचा प्रयोग घोडंबदर सेवा रस्त्याचे ज्या पद्धतीने डांबरीकरण करण्यात येत आहे, ती पद्धत २०१२ मध्येही अवलंबिली होती. कॅडबरी सेवा रस्ता, तसेच इतर काही रस्त्यांची कामे यानुसार केली होती. बीबीएम पद्धतीने हे डांबरीकरण केले होते. हे रस्ते आजही चांगल्या स्थितीत आहेत. त्यानुसार आता या सेवा रस्त्यांचे कामही करण्यात येत असून त्यांचे आयुर्मान तीन वर्षांचे धरले आहे.