डोंबिवली : संथगतीने सुरू असलेली विकासकामे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दोन वर्षांहून अधिक काळ ठाकुर्ली परिसरातील ९० फुटी रोड आणि रेल्वे समांतर रस्त्यावर पाहायला मिळाले. परंतु, ही विकासकामे मार्गी लागल्याने हे दोन्ही रस्ते लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. ९० फुटी रोडवरील डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर, समांतर रस्त्यांवरही खडीकरणाला सुरुवात झाली आहे.
केडीएमसी हद्दीत अमृत योजनेंतर्गत सर्व मलवाहिन्या टाकण्यात आल्या. परंतु, ठाकुर्लीतील ९० फुटी रोड आणि कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर मात्र दोन वर्षांहून अधिक काळ ही कामे चालू होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ही कामे करण्यात आली. परंतु, कामाच्या संथगतीमुळे या दोन्ही रस्त्यांवरचे एका दिशेकडील मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवलेले होते. याचाच एक भाग असलेल्या कल्याणहून डोंबिवलीकडे येणाऱ्या समांतर रस्त्यावर मलवाहिनी टाकण्यासाठी मागील वर्षी खोदकाम केले होते. काम झाल्यावर खोदलेल्या भागात काही महिन्यांपूर्वी केवळ खडीकरण केले होते. त्यात पुन्हा महानगर गॅसवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परंतु, आता ते काम मार्गी लागले असून, खोदकामाच्या ठिकाणी खडीचा भराव टाकायला सुरुवात झाली आहे. तेथे लवकरच डांबरीकरण केले जाणार आहे.
प्रवास होणार दिलासादायक
- ९० फुटी रोडवरील म्हसोबा चौक ते खंबाळपाडा रोडकडे जाणारा रस्ताही या दोन्ही कामांसाठी बरेच महिने खोदलेला होता. त्याच्यावरही लवकरच डांबर टाकले जाणार आहे.
- म्हसोबा चौकाकडे येणारा मार्गही खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांची कसरत सुरू होती. परंतु, आता त्या मार्गावरही डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत आणला आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवरचा प्रवास पुन्हा दिलासादायक होणार आहे.
--------
फोटो आहे
---------------