डोंबिवली : प्राणघातक हल्ल्यात कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या अनिकेत ऊर्फ पांडा म्हात्रे आणि अन्य दोघांनी रूपेश शिंदे यांच्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना ६ मे रोजी घडली होती. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात शिंदे याच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील अनिकेतला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पश्चिमेतील गरिबाचा वाडा, महात्मा फुले नगरमधील कोलते जनरल स्टोअर्ससमोर उभ्या असलेल्या अनिकेत म्हात्रे, साहील श्रीनिवास ठाकूर ऊर्फ वालट्या आणि सोमेश नवनाथ म्हात्रे या तिघांना रूपेश याने दुकानदार कोलते यांच्या घराचा दरवाजा ठोठावू नका, असे सांगितले. त्याचा राग आल्याने तिघांनी रूपेशला शिवीगाळ करीत मारहाण केली. यातील अनिकेतने रूपेशच्या गळ्यावर उजव्या बाजूला चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर साहिल याने बांबूने पाठीवर व डोक्यावर प्रहार केला. सोमेश यानेही रूपेशला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर तिघांनी पलायन केले होते.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व कारागृहाच्या बाहेर पॅरोलवर असलेला अनिकेत हा मोठागाव खाडीजवळ येणार असल्याची माहिती विष्णूनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने तेथे सापळा लावून अनिकेतला जेरबंद केले.
-----------------------