उल्हासनगर : वालधुनी नदीच्या महापुराचा फटका बसलेल्या सात हजारापेक्षा जास्त घरांची तहसील कार्यालयाकडून पाहणी व पंचनामा करण्यात आला होता. पूरग्रस्त नागरिकांना तहसील कार्यालयाकडून रोख स्वरूपात ५ हजार तर १० हजार रूपये बँक खात्यात जमा केली जाणार असून आतापर्यंत चार हजारापेक्षा जास्त नागरिकांना मदत दिल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांनी दिली.
वालधुनी नदीच्या पुराचा फटका बसलेल्यांना सरकारची मदत मिळावी अशी मागणी झाल्यावर तहसील कार्यालयामार्फत तब्बल ७ हजारापेक्षा जास्त घरांचा पंचनामा करण्यात आला. तहसीलदार वाकोडे यांनी पाच पथकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत पंचनामा केलेल्या नागरिकांना पाच हजार रोख स्वरूपात तर १० हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
तसेच इतर पंचनामा केलेल्या पूरग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू राहणार असल्याचे वाकोडे यांनी सांगितले. तर दुसरीकडे पुराचा फटका बसूनही घराची पाहणी व पंचनामा झालेला नाही, अशा नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे मदतीसाठी अर्ज केले आहे. त्यांच्या अर्जाचाही सरकारला विचार करावा लागणार आहे.
उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा फटका २५ जुलै रोजी समतानगर, सम्राट अशोकनगर, आशीर्वाद व रेणुका सोसायटी, पंचशीलनगर, मातोश्री मीनाताई ठाकरेनगर, प्रबुध्दनगर, करोतियानगर, हिराघाट, स्मशानभूमी परिसरातील हजारो नागरिकांना बसला. अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य, शैक्षणिक साहित्य वाहून अथवा खराब झाले होते. सामाजिक संघटनेसह शिवसेना, इतर पक्षांनी पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडयाचे वाटप केले. तसेच आरोग्य शिबिर घेऊन तपासणी केली होती.
अनेक घरांचा पंचनामा झालेला नाहीपूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. तहसील कार्यालयाने याची दखल घेत पूरग्रस्त घरांची पाहणी व पंचनामा करत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्यानुसार पूरग्रस्त नागरिकांना मदत दिली जात आहे. मात्र आजही अनेक पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा झालेला नाही. अशांना मदत मिळावी असी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. वंचित राहिलेल्या शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेऊन मदतीसाठी अर्ज केले आहेत.