कल्याण: कल्याणात झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये दिशा थिएटर्स, मुंबईची अस्तित्व या एकांकिकेने बाजी मारली. अस्तित्वने सर्वात्कृष्ट एकांकिकेसह आणखी पाच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. एकांकिका स्पर्धेमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या 'कल्पना एक अविष्कार अनेक 2018' या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात घेण्यात आली. विशेष म्हणजे या एकांकिकेच्या गेल्या 30 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईबाहेर स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. त्यामध्ये उन्नती आर्ट्स, मुंबई यांची भूत मनातलं की, रंगभूमी कलाकार, मुंबई यांची कपाळमोक्ष, दिशा थिएटर्स, मुंबई यांची अस्तित्व, एपिटोम थिएटर्स यांची टाहो या चार एकांकिकांनी धडक मारली होती. अस्तित्व या एकांकिकेने सर्वात्कृष्ट एकांकिकेसह सर्वात्कृष्ट दिग्दर्शक पृथ्वीराज फडके, सर्वोत्कृष्ट लेखन दिपाली घागे, सर्वोत्कृष्ट अभिनय प्रसाद दाणी-राजश्री परूळेकर म्हात्रे आणि सर्वोत्कृष्ट तांत्रिक असे पाच इतर पुरस्कार ही पटकावले आहेत. भूत मनातलं की ने सर्वोत्कृष्ट एकांकिकेच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट अभिनय आश्लेषा गाडे आणि टाहो एकांकिकेने सर्वोत्कृष्ट अभिनायासाठी अनिकेत चव्हाण, अक्षय राणे यांनी प्रत्येकी दोन पुरस्कार पटकावले आहेत. स्पर्धेचे परिक्षण विद्याधर पाठारे, विजू माने, किरण खांडगे, मकरंद-मुकुंद यांनी केले आहे.
कल्याणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अस्तित्वची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 10:14 PM