कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहे. खड्ड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने गुरुवारी खड्ड्यांत निर्ढावलेल्या व सुस्त प्रशासनाचे प्रतीकात्मक श्राद्ध घातले. खड्ड्यांमुळे चंद्रावर चालल्याची प्रचीती येत असल्याने अंतराळवीराची वेशभूषा करून येथे एकाला यावेळी आणले होते. दरम्यान, यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.पश्चिमेतील सहजानंद चौक ते पेट्रोलपंपाच्या दिशेने हे आंदोलन करण्यात आले. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, सचिव इरफान शेख, गणेश चौधरी, दिनेश साळवे, सचिन शिंदे, रूपेश भोईर, सचिन पोपलाइतकर, संतोष अमृते, स्वप्नील सातवे, कपिल पाटील आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.मनसेने १३ सप्टेंबरला राज्य रस्ते विकास महामंडळास आपल्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, तरीही महामंडळाने खड्डे न भरल्याने मनसेने गुरुवारी हे आंदोलन केले.पत्रीपुलानजीक पडलेल्या खड्ड्यांमुळे आॅगस्टमध्ये अरुण महाजन यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, त्याच्या कुटुंबीयांना कोणतीच मदत सरकारने दिलेली नाही.राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित हा रस्ता असताना अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई झालेली नाही. केडीएमसीनेही खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. मात्र, हा पैसाकंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या खिशात घातला असल्याने खड्डे बुजविले जात नाही, असे मनसेचे म्हणणे आहे.युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा बुधवारी कल्याण-डोंबिवलीत आली होती. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने यात्रेच्या अवघ्या तासाभरापूर्वी खड्डे भरण्याचा फार्स केला. नागरिकांचा जीव जात असताना खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. नेत्यांना त्रास होऊ नये, यासाठी खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याचे भासविले जाते, असा आरोप मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
कल्याण शहरात खड्ड्यांत चक्क अवतरला ‘अंतराळवीर, मनसेचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 1:17 AM