लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई आणि ठाण्यातील खगोलप्रेमींनी शहापुरातील नारायणगाव येथील एका खासगी निरीक्षण केंद्रावरून ग्रहताऱ्यांना जवळून न्याहाळण्याचा अनुभव शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेच्या सुमारास घेतला. अनेक ग्रहांना न्याहाळण्याची संधी मिळाल्याने बच्चेकंपनीनेही आनंद व्यक्त केला.पालघर जिल्ह्यातील वसई येथील मूळचे रहिवासी असलेले जय नदाफ यांनी आपल्या नारायणगाव येथील घराच्या आवारात उभारलेल्या निरीक्षण केंद्रावर आकाशगंगेतील तारांगण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. यामध्ये ठाण्यातून एमसीएचआयचे सदस्य पीयूष शहा, मुलुंड येथील उद्योजक संजय शाह आणि गोरेगाव येथील टेलिस्कोपचे निर्माते राजू पटेल यांच्यासह ३० ते ४० जणांच्या चमूने ग्रहतारे न्याहाळण्याचा अनुभव घेतला. २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते ५ वाजताच्या सुमारास सूर्यनारायणाचे दर्शन या खगोलपे्रमींनी घेतले. त्यापाठोपाठ सायंकाळी ७ वाजता चंद्र त्यानंतर रात्री ११.४५ वाजता शुक्र पाहायला मिळाला. १ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजता मंगळ,
५ वाजून १५ मिनिटांनी गुरू आणि सकाळी ६ वाजता शनी टेलिस्कोपमधून या मंडळींना पाहायला मिळाला. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात काही काळ निसर्गाच्या सान्निध्यातही आले पाहिजे. तरुण पिढीला ग्रहताऱ्यांचीही माहिती झाली पाहिजे. अवकाशात तारांगण कसे पाहावे, याचीही माहिती झाली पाहिजे, या हेतूने प्रत्येक महिन्याला आपण शहापुरातील माहुली तसेच नारायणगाव येथे खास अवकाश निरीक्षणासाठी आवर्जून भेट देत असल्याचे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक पीयूष शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नभातील चांदणे न्याहाळण्याचा आनंद लुटता आल्यामुळे जागरण करूनही प्रत्येकाच्या चेहºयावर वेगळेच समाधान यावेळी पाहायला मिळाले.