- जान्हवी मोर्ये कल्याण : मुत्सद्दी नेते, उत्कृष्ट संसदपटू, अजातशत्रू तसेच संवेदनशील कवी भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी कवी, प्राध्यापक दिनेश गुप्ता हे आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार आहेत. गुप्ता सलग १२ तास कवितालेखन करणार आहेत. गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.सार्वजनिक वाचनालयातर्फे वाजपेयी यांना ही काव्यमय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आजपर्यंत सलग १२ तास कविता लिहिण्याचा विक्रम कुणीही केलेला नाही. त्यामुळे हा प्रयत्न करताना जास्तीतजास्त कविता आणि आकारानेही मोठ्या कविता लिहिणार असल्याचे गुप्ता म्हणाले.गुप्ता हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. ते नेरळच्या दिलकापकर इंजिनीअरिंग महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसरपदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही त्यांच्यापुस्तकाचे कौतुक केले आहे. काही वर्षांपासून ते हिंदी, मराठी, इंग्रजीमध्ये लेख आणि कविता लिहीत आहेत. त्याचबरोबर त्यांची भाषणेही प्रेरणादायी असतात. आफ्रिकेतील इथिओपिया येथून ‘लाइफ कॉच’ची पदवी प्राप्त केली आहे. आतापर्यंत त्यांनी १५ देशांत जाऊन ३२ हजारांहून अधिक लोकांना मार्गदर्शन केले आहे. २१०० व्याख्याने दिली आहेत. ते अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकारिणी सदस्यपदांवर कार्यरत आहेत. त्यातून त्यांनी ४६ जोडप्यांना विवाहबद्ध केले आहे.शिक्षण, पर्यावरण आणि आध्यात्मिक क्षेत्रात ते निरंतर सेवा करत आहेत. सहा हजारांहून अधिक पुस्तकांचे वाचन त्यांनी केले आहे. याशिवाय, त्यांना लोकांशी परिचय वाढवणे, पेंटिंग बनवणे, गाणी म्हणे, नवीन भाषा शिकणे, फोटोग्राफी आदी छंद त्यांनी जोपासले आहेत.आगामी पुस्तके‘दैनिक जीवन में भगवद्गीता’, ‘पैसे की समझ’, ‘सफलता के शिखर पर भाग-२’, ‘कसौधन बिरादरी - इतिहास और भविष्य’ ही प्रा. गुप्ता यांची पुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहेत.
अटलजींना आगळीवेगळी काव्यांजली; दिनेश गुप्ता लिहिणार १२ तास कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:14 AM