ठाणे : घोडबंदर रोडवरील बँकेचे एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्वतसिंग चुंडावत (४३) याच्यासह तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने अवघ्या ३६ तासांमध्ये जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शनिवारी दिली. या सर्व आरोपींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर रोडवरील लॉकीम कंपनीसमोरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना १ आॅक्टोबर २०१९ रोजी पहाटे ४.१२ ते ४.३९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. एटीएम केंद्राचे शटर आतून बंद करून गॅसकटरच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करून कॅश डिपॉझिट मशीन कापून मोठे नुकसान केले. सुदैवाने त्यांना यातील रोकड लुटता आली नाही. याच परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये दोघेजण चोरटे आढळून आले होते. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कापूरबावडी पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही यातील आरोपींचा शोध घेत होते. यातील एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणारी टोळी बाळकुम परिसरात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे यांना मिळाली. ही माहिती तसेच सीसीटीव्हीतील चित्रण आणि सुमारे १० ते २० हजार मोबाइल विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपींचा माग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, उपनिरीक्षक प्रदीप भोईर, पोलीस कॉन्स्टेबल शेजवळ आणि अदिती तांबे आदींच्या पथकाने काढला. ठाण्यातील बाळकुम, साकेत रोड परिसरात सापळा लावून पर्वतसिंग चुंडावत (रा. मनोरमानगर, मूळ रा. राजस्थान), राजसिंग ठाकूर (३५, रा. इंदिरानगर, मूळ रा. उत्तरांचल) आणि अमोल संपत यादव ऊर्फ अमोल सोमनाथ शुक्ला (३०, रा. ठाणे, मूळ रा. सातारा) या तिघांनाही या पथकाने अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी एटीएम फोडून त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. हे तिघेही अट्टल गुन्हेगार आहेत.लाखोंच्या विम्यासाठी स्वत:च्या खुनाचा बनावपर्वतसिंग याने ५० ते ६० लाखांच्या विम्यातील पैसे मिळविण्यासाठी स्वत:च्याच खुनाचा बनाव केला होता. त्याने त्याच्यासारख्याच शरीरयष्टीच्या एका अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याच्याजवळ स्वत:चे ओळखपत्र ठेवले.राजस्थानमध्ये त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा अंत्यविधीही केला. त्यानंतर, ठाण्यात दीड वर्षापूर्वी एका गुन्ह्यात पकडल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले.मात्र, त्याला समोर दाखवल्यानंतर त्याचा बनाव उघड झाला होता. या प्रकरणात तो जामिनावर सुटला होता. त्याआधी २००९ मध्येही पैशांसाठी आपल्याच भावाचा त्याने खून केला होता. त्याही गुन्ह्यात त्याची जामिनावर सुटका झाली होती.
एटीएम फोडणारी टोळी ठाण्यात जेरबंद, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:04 AM