वाडा : श्रमजीवी संघटना आदिवासींच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करीत असून राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना कोंडीत पकडत आहेत. वारंवार होणाऱ्या आंदोलनाने त्रस्त झालेल्या मंत्र्यांच्या समर्थनासाठी सोमवारी भाजपने श्रमजीवीच्या विरोधात निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त केला. मात्र, त्याअगोदरच श्रमजीवीने आंदोलन केल्याने दोन्ही संघटनांचा जमाव आमने-सामने उभा ठाकला. यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. रविवारी भारतीय आदिवासी पँथर्स या संघटनेच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या निवासस्थानावर घंटानाद आंदोलन करण्यासाठी आले होते. या आंदोलकांपैकी काही आंदोलक पोस्ट कार्यालयाजवळ नाश्ता आणण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्ताधारी पक्षाकडून अशा पद्धतीने मारहाण झाल्याने त्याविरोधात श्रमजीवी संघटनेने सोमवारी सवरांच्या निवासस्थानासमोर या घटनेचा निषेध मोर्चा काढला. मात्र, हा मोर्चा निवासस्थानाकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी रोखून ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.यानंतर सवरांच्या समर्थनासाठी त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष व आमदार पास्कल धनारे व नेते बाबाजी काठोले यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवीच्या विरोधात तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून संघटनेचे नेते विवेक पंडित, सरचिटणीस विजय जाधव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून श्रमजीवी संघटना मंत्री सवरांना बदनाम करीत असल्याचा आरोप काठोले यांनी या वेळी केला.भाजपच्या मोर्चात श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्याविरोधात घोषणाबाजी झाल्याने मोर्चा संपवून गेलेले श्रमजीवीचे कार्यकर्ते पुन्हा जमून त्यांनीसुद्धा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही संघटना आमने-सामने आल्याने मोठा संघर्ष निर्माण होण्याचा धोका संभवत होता. मात्र, पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून दोन्ही जमावांना वेगवेगळ्या ठिकाणी रोखून धरण्याची कसरत करावी लागली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणाचे सूत्रधार मंत्री विष्णू सवरा हेच असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रमजीवीने तर विष्णू सवरा यांना उघडपणे आव्हान देणाऱ्या श्रमजीवीचे विजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दोघांनी लावून धरली. (वार्ताहर)
वाड्यात वातावरण तंग
By admin | Published: November 30, 2015 11:13 PM