लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेने हॉटस्पॉट क्षेत्रांत पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेक संस्थांनी आपले नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले. परंतु महापालिकेने मंगळवारी लॉकडाऊनच्या निर्णयापासून यू-टर्न घेतल्याने आयोजकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ठाण्यात कार्यक्रम ऑफलाइन करायचे की ऑनलाइन याबाबत आयोजकांसह रसिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाइन होऊ लागले. जसजशी लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता येत गेली तसतसे ऑनलाइन कार्यक्रम ऑफलाइन झाले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मर्यादित संख्येत कार्यक्रम साजरे होऊ लागले. कार्यक्रम ऑफलाइन व्हावेत अशी आयोजकांसह रसिकांचीही इच्छा होती. परंतु मार्चच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन शक्यता वर्तवली आणि अनेक आयोजकांनी आपले ठरलेले ऑफलाइन कार्यक्रम रद्द करून पुन्हा ऑनलाइन केले तर काहींनी कार्यक्रम पुढे ढकलले. काही सांस्कृतिक संस्थांनी मर्यादित रसिकांच्या उपस्थितीत आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑफलाइन कार्यक्रम घेण्याचे ठरवले. पुन्हा सोमवारी रात्री पालिकेने १६ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन जाहीर करताना सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू केले. त्यामुळे आयोजक आणि रसिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना पाहुण्यांच्या, कलाकारांच्या तारखांचे नियोजन, कार्यक्रमस्थळाची उपलब्धता, रसिकांच्या सोयीची वेळ आदी बाबींचा विचार करावा लागतो. लॉकडाऊन व निर्बंधांबाबत प्रशासनाने विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. धरसोडीच्या वृत्तीमुळे त्याचा फटका कार्यक्रमाच्या आयोजकांना बसत असल्याचे प्रकाशक, सांस्कृतिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचे म्हणणे आहे.
----------------------------------------------
व्यास क्रिएशन्सचा १३ मार्च रोजी पुस्तक प्रकाशन सोहळा होणार होता. परंतु, सोमवारी लॉकडाऊनचे परिपत्रक ठाणे महापालिकेने काढल्यानंतर हा सोहळा रद्द करावा लागला.
- रामदास खरे, कवी, लेखक
......
वाचली.